जळगाव : शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटात गेलेले संजय शिरसाट लवकरचं ठाकरे गटात परतणार. ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हा मोठा दावा केलाय. संजय शिरसाट हे आमच्या संपर्कात असल्याचंही अंधारे यांनी म्हंटलंय. संजय शिरसाट हे शिंदे गटात अस्वस्थ आहेत, असं सुषमा अंधारे म्हणाल्या. संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाची इच्छा बोलून दाखविली होती.
सुषमा अंधारे म्हणाल्या, दोर आमच्याकडून कापले गेले नाहीत. मातोश्री सर्वांना जवळ करते. मला असं वाटतं की, आता पहिल्यांदा परत येणारे कोणी असतील, तर ते संजय शिरसाट असतील. संजय शिरसाट सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत. परेशान आहेत. त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली नाही.
उलट, संभाजीनगरमध्ये अतुल सावे, अब्दुल सत्तार आणि सांदीपान भुमरे अशा तीनही लोकांना मंत्रिपदं मिळालीत. त्यामुळं संजय शिरसाट यांची मंत्रिपदाची आशा मावळली.
शिंदे गटाकडून काही कार्यकारिणीची पदं जाहीर झाली. त्यातही संजय शिरसाट यांना काहीही मिळालं नाही. त्यामुळं ते ठाकरे गटात परतणारे पहिले आमदार असतील, असं सुषमा अंधारे यांना वाटतं.
भाजपतील किरीट सोमय्या यांची ईडीसोबत सलगी आहे. कोविड काळात जे काही गैरव्यवहार झाले आहेत त्याकडं त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. पाचोळ्याच्या ठिकाणचे चार-पाच सार्वजनिक उपयोगाचे प्लाट राखीव केले गेलेत.
नगररचना कायद्यानुसार किमान वीस वर्षे त्यात काही बदल केला जात नाही. पण, 2015 मध्ये रिझर्व्ह केलेले प्लाट कोविड काळात आरक्षण हटविले जात असेल, तर 207 कोटींचा व्यवहार झाला. यावर किरीट सोमय्या यांनी लक्ष द्यावं, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.