जळगाव : शहरातील आदर्श नगर परिसरातील वेगवेगळ्या तीन घटनांमध्ये तीन चारचाकी (Four Wheeler) आणि सहा दुचाकी (Two Wheeler) अज्ञात माथेफिरूंनी पेट्रोल टाकून पेटवून (Burned) टाकल्याचा प्रकार गुरूवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. वाहनांना पेटविल्याच्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अक्षरश: पाच दुचाकी आगीत जळून खाक झाल्या. दरम्यान, काही माथेफिरू हे सीसीटीव्ही कॅमेल्यात कैद झाले असल्याची माहिती मिळाली आहे. आदर्श नगर परिसरात एसएसडी हाईट्समध्ये रहिवासी राजेश सावंतदास पंजाबी यांचे इमारतीचे काही बांधकाम अद्याप बाकी असून खाली सुरक्षारक्षक देखील परिवारासह राहतो. गुरूवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात तीन माथेफिरू तरुणांनी 3 दुचाकी आणि एक चारचाकीच्या बोनेटमध्ये साडी अडकवली. नंतर पेट्रोल ओतून त्यांनी वाहनांना आग लावली. या आगीमध्ये दुचाकी संपूर्ण खाक झाल्या आहेत. तसेच चारचाकीचा देखील पुढील भाग व चाक जळून नुकसान झाले आहे.
दुचाकी जळत असताना अचानक जोरात आवाज झाला. त्यामुळे पंजाबी यांच्या घराच्या सुरक्षारक्षकाला जाग आली. त्याने लागलीच मालक राजेश पंजाबी यांना फोन केला आणि वाहने जळत असल्याची माहिती दिली. राजेश हे कुटुंबीयांसह खाली आले. पण, आगीचे लोळ एवढे होते की पायऱ्यांच्या खाली उतरणे सुध्दा त्यांना कठीण झाले होते. अखेर शेजारच्यांच्या मदतीने वाहनांवर पाणी टाकून आग विझविण्यात आली. दरम्यान, पंजाबी यांच्या वाहनांना आग लावल्यानंतर माथेफिरू तरुणांनी जवळच असलेल्या सृष्टी अपार्टमेंटमध्ये लावलेली दुचाकी जाळण्याचा प्रयत्न केला. आगीत दुचाकीचे सीट आणि मागील काही भाग जळाला आहे. त्यानंतर आराध्य अपार्टमेंटमध्ये एका डॉक्टरची चारचाकी, ओम नमः शदाराम इमारतीत एक चारचाकी, जय गुरुदेव अपार्टमेंटमध्ये दोन दुचाकी जाळल्या. वाहनांना आग लावल्यानंतर तीन माथेफिरूंनी दुचाकीने धूम ठोकली. परंतु, काही अंतरावर वाळू असल्यामुळे त्यांची दुचाकी घसरली आणि दोन जण खाली कोसळले.
वाहने पेटवल्याची माहिती मिळाल्यानंतर मध्यरात्री जळगाव मनपाच्या अग्निशमन दलाच्या बंबांनी काही मिनिटात घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. अथक प्रयत्नांनी आग विझविण्यात आली. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे विक्रांत घोडस्वार, नंदकिशोर खडके, वसंत दांडेकर, भगवान जाधव, रवी बोरसे यांनी आग विझविण्यासाठी सहकार्य केले. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजय शिंदे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळांची पाहणी केली. त्यानंतर संपूर्ण घटनांची माहिती घेतल्यानंतर कोणत्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, याची तपासणी केली. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहे, तेथे जाऊन फुटेज तपासण्यात आले. एका ठिकाणच्या घटनेत आग लावताना तसेच आग लावल्यानंतर कुंपणाची भिंत ओलांडून पसार होताना माथेफिरू कैद झाले आहेत. त्यावरून पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे.