रावेर/जळगाव : मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशात याचा मोठा फटका बसला आहे. अवकाळीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेलं पीक वाया गेल्याने शेतकरी आता आम्ही जगायचं कसं असा सवाल उपस्थित करत आहे. जळगाव जिल्ह्यालाही अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे. गहू, मका, ज्वारी, कलिंगड आणि टरबूज पीक पूर्णतः वाया गेले आहे.
अवकाळीनंतर जे शेतात उरलेला शेतमाल आहे. त्याला आता बाजारभाव नाही. कवडीमोल दराने शेतमाल विकला जात असल्याने शेतकरी आता दुहेरी संकटात सापडला आहे.
जळगाव जिल्ह्यात टरबूजाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र यंदा टरबूज उत्पादकांना अवकाळी पावसाचा जोरदार फटका बसला आहे.
त्यामुळे काढणीला आलेले टरबूज अवकाळी पावसाच्या माऱ्याने खराब झाले आहेत. मात्र शिल्लक राहिलेल्या टरबूजालाही बाजारभाव नसल्याने टरबूज शेतकऱ्यांनी आता आम्ही जगायचे कसे असा सवाल उपस्थित केला आहे.
अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने टरबुजाचे मोठे नुकसान झाले आहे.
तर शेतात असणारी टरबूजही अक्षरशः खराब झाले आहेत. त्याचा उत्पन्नावर परिणाम होत असल्याने व्यापारी ही बाजारपेठेत कमी रुपयामध्ये खरेदी करत आहेत.
अवकाळी पावसामुळे टरबूज खराब झाल्याने टरबूजालाही योग्य बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतात असलेल्या टरबूजामुळेही आता शेतकऱ्यांना आर्थिक फायदा न होता त्याचा त्यांना तोटाच होऊ लागला आहे.