संजय राऊतांपाठोपाठ एकनाथ खडसेंची बावनकुळेंवर टीका; म्हणाले, प्रदेशाध्यक्षपदावर असताना…

| Updated on: Nov 21, 2023 | 3:48 PM

Eknath Khadse on Chandrashekhar Bawankule Sanjay Raut : संजय राऊतांच्या ट्विटनंतर एक फोटो व्हायरल झाला आहे. यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. एकनाथ खडसे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका अन् संजय राऊत यांना आवाहन; पाहा काय म्हणाले...

संजय राऊतांपाठोपाठ एकनाथ खडसेंची बावनकुळेंवर टीका; म्हणाले, प्रदेशाध्यक्षपदावर असताना...
Eknath Khadse
Follow us on

किशोर पाटील, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, जळगाव | 21 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट केला. यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका होऊ लागली. या सगळ्याला भाजपने उत्तर दिलं. तर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेतून संजय राऊत यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. या सगळ्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची स्थिती ही अस्थिर असताना एखाद्या प्रमुख पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला असे करणे उचित नाही, असं एकनाथ खडसे म्हणालेत. तसंच संजय राऊतांनाही त्यांनी आवाहन केलं आहे.

व्हायरल फोटोवर खडसे म्हणाले…

व्हायरल फोटोवरून एकनाथ खडसे यांनी बावनकुळेंवर जोरदार टीका केली आहे. तसंच खासदार संजय राऊत यांच्याकडे असलेले सर्व फोटो जनतेसमोर आणावेत. त्यामुळे नेमकं खरं काय आणि खोटं काय ते जनतेसमोर येईल. चंद्रशेखर बावनकुळे यांचे सर्व फोटो जनतेसमोर यावेत, असं आवाहन खडसेंनी केलं आहे.

“मराठा आरक्षणासाठी सरकारने…”

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे. यावरही खडसेंनी प्रतिक्रिया दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एकनाथ खडसे यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना लक्ष्य केलं आहे. मराठा आरक्षण दिलं नाही. तर राजकीय संन्यास घेईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा तो शब्द पाळावा. सरकारचे संकट मोचक म्हणून गिरीश महाजन यांनीही मराठा समाजाला आरक्षणाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घ्यावा. आरक्षणासाठी वारंवार मराठा समाजाला अशा पद्धतीची खेळवत राहणं ही सरकारची भूमिका योग्य नाही. टिकणारं आणि कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळायला पाहिजे, अशी अपेक्षा आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.

छगन भुजबळांच्या भूमिकेवर म्हणाले…

अजित पवार गटाचे नेते, मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणासाठी ठाम भूमिका घेतली आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिलीय. छगन भुजबळ यांनी आयुष्यभर ओबीसींचे प्रश्न मांडले. इतर समाजाविषयी द्वेषाची भावना असण्याचं कारण नाही. आपल्या समाजाचा अभिमान बाळगताना दुसऱ्या समाजाबद्दल देशाची भावना असू नये. हे राजकारणात प्रत्येकाने पाळलं पाहिजे, असं खडसे म्हणाले.