जालना | 31 ऑक्टोबर 2023 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला. या दोघांमध्ये फोनवरून काही वेळेपूर्वी चर्चा झाली. यावेळी दोघांमध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. राज्य सरकारने कुणबी प्रमाणपत्राबाबत काय निर्णय घेतला. आजपासून मराठा समाजाला कुणबी प्रमाण पत्र दिलं जाणार आहे. यावरही या दोघांमध्ये चर्चा झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे देण्याबाबत आजच्या केबिनेटमध्ये ठोस निर्णय घेण्यात येणार असल्याचं जरांगे पाटील यांना सांगितलं. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न कायदेशीररित्या सोडवणं गरजेचं आहे. त्यासाठी शासनाने सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे. या पिटीशनवर सुनावणी घ्यायला न्यायालयाने होकार दिलेला आहे, असंही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
आम्हाला अर्धवट आरक्षण नको. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. जरांगे यांनी मराठा आरक्षणाबाबत अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना बोलावलं. या अभ्यासकांशी चर्चा करून मनोज जरांगे पुन्हा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे अंतरवाली सराटी गावात जाणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेवेळी शेतीचे नुकसान झालं होतं. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संदर्भात मंगेश चिवटे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार आहेत. मंगेश चिवटे हे मनोज जरांगे पाटील यांना उपोषणादरम्यान पाणी घ्यावं, म्हणून विनंती करणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावते आहे. मनोज पाटील यांनी सात दिवस वैद्यकीय उपचार घेतले नाहीत. मराठा आरक्षण संदर्भात होणारं आंदोलन आता तीव्र होत चाललं आहे. उग्र न शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन जरांगे पाटील करत आहेत. त्यांच्या या आवाहनानंतरही बीडमध्ये जाळपोळ झाली. तर ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात येत आहे.