सागर सुरवसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, अंबड, जालना | 17 नोव्हेंबर 2023 : ज्या जालना जिह्यातून मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटला. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेृतृत्वात आरक्षणाच्या मुद्द्यासाठी मराठा बांधव रस्त्यावर उतरला. त्याच जालन्यात आज ओबीसी समाजाची जाहीर एल्गार महासभा होत आहे. ओबीसींच्या हक्कासाठी ही परिषद होतेय. या महासभेला राज्यातील विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील ओबीसी नेते उपस्थित राहणार आहेत. एकीकडे मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन उभं राहिलं आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहे. अशातच मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याला ओबीसी नेत्यांनी विरोध केला आहे. याच विरोधाचं व्यापक रूप आज जालन्यात दिसणार आहे.
जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी नेते आणि ओबीसी बांधव एकवटणार आहेत. सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांकडून अंबडमध्ये आरक्षण बचाव एल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. मंत्री छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर, महादेव जानकर यांच्या नेतृत्वात होणार एल्गार सभा होणार आहेत. तर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यादेखील या सभेला येणार असल्याची माहिती आहे.
सामान्य ओबीसी बांधवदेखील या सभेसाठी जालन्यात दाखल होत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता सरकारने आरक्षण द्यावं. आमची मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना विनंती आहे की आमच्या हक्काचं आरक्षण देऊ नये. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन आहे की, जर ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही ओबीसी समाजातील 360 जातीतील प्राणाची आहुती देऊ. आमच्या आरक्षणाला धक्का लागला तर आम्ही काय करू आम्हाला देखील माहिती नाही. इतर समाजाला जे आरक्षण द्यायचे आहे ते द्या मात्र ओबीसीला धक्का न लावता द्या, असं म्हणत ओबीसी बांधव एकवटला आहे.
आज जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये होणाऱ्या ओबीसींच्या सभेला पाच लाख ओबीसी बांधव येतील असा अंदाज राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केला आहे. सध्याचा परिस्थिती समाजामध्ये सध्या संविधानिक अधिकारावर गदा येईल का? अशी भीती आहे. हीच भीती दूर करण्यासाठी तसेच जरांगे पाटलांनी ज्या जिल्ह्यातून मराठा आरक्षणाचासाठी रान पेटवलं आहे. त्याच जालन्यातील अंबडमध्ये जाहीर सभेतून ओबीसी समाजाला एकत्रित करण्याचं काम आम्ही करतो आहोत, असं बबनराव तायडे यांनी म्हटलं आहे.