जालन्यातील तरुणाला केलेली अमानुष मारहाण पोलिसांना भोवली, PSI सह 5 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन

| Updated on: May 28, 2021 | 9:55 PM

भाजपच्या सुवा सरचिटणीस शिवराज नरियलवाले याला पोलिसांनी दांडके तुटेपर्यंत मारहाण केली होती. अखेर अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आलीय.

जालन्यातील तरुणाला केलेली अमानुष मारहाण पोलिसांना भोवली, PSI सह 5 पोलीस कर्मचाऱ्यांचं निलंबन
जालन्यातील तरुणाला मारहाण करणाऱ्या पोलिसांचं निलंबन
Follow us on

जालना : एका भाजप कार्यकर्त्याला केलेली अमानुष मारहाण प्रकरणात अखेर पोलिसांवर कारवाई करण्यात आलीय. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह 5 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भाजपच्या सुवा सरचिटणीस शिवराज नरियलवाले याला पोलिसांनी दांडके तुटेपर्यंत मारहाण केली होती. मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं झाला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यानीही या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. त्यानंतर अखेर अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आलीय. (5 policemen suspended for beating BJP activist in Jalna)

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजप नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. तसंच सोशल मीडियावर अनेक स्तरातून संताप व्यक्त केला जात होता. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केलीय. PSI भगवत कदम, पोलीस कर्मचारी सोमनाथ लहामगे, नंदकिशोर ढाकणे, सुमित सोळुंखे आणि महेंद्र भारसाकळे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. असं असलं तरी मारहाण करणारे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचं निलंबन कधी होणार असा प्रश्न विचारला जात आहे.

फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

भाजप कार्यकर्त्याला झालेल्या अमानुष मारहाणीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मुद्द्यांवर परखड मत व्यक्त केलंय. पत्रातून ते म्हणतात, जालना येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना 9 एप्रिल 2021 रोजी जालन्यातील दीपक हॉस्पिटलमध्ये झालेल्या अमानुष, रानटी मारहाणीचा व्हिडीओ काल समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला होता. शिवराज नारियलवाले हे 9 एप्रिल रोजी दीपक हॉस्पिटलमध्ये आपल्या बहिणीला उपचारासाठी घेऊन गेले होते. त्याच सुमारास गवळी समाजाच्या एका युवकाचा अपघाती मृत्यू तेथे झाला आणि त्यामुळे तेथे काही लोक धुडगूस घालत होते.

त्यावेळी तेथे उपस्थित काही पोलीस हे गवळी समाजाबद्दल अतिशय अर्वाच्य शब्दात शिवीगाळ करीत असल्याने शिवराज नारियलवाले यांनी पोलिसांची ही शिवीगाळ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केली. आपल्या समाजाबद्दल इतक्या आपत्तीजनक शब्दांत कुणी बोलत असेल तर त्याचे चित्रीकरण करणे एवढाच काय तो त्यांचा गुन्हा. पण त्यांना त्याची जी जबर शिक्षा उपस्थित पोलिसांनी दिली, ते या व्हिडीओतून दिसून येते. गणवेशातील 6 आणि गणवेशात नसलेले 2 असे आठ पोलीस त्यांना घेरून अमानुष मारहाण करीत होते. अगदी डोक्यावर सुद्धा मारहाण करण्यात आली, असंही देवेंद्र फडणवीसांनी पत्रात नमूद केलंय.

आमदार राम सातपुतेंचीही कारवाईची मागणी

दरम्यान, जालना शहरातील भाजप कार्यकर्ता शिवराज नारियलवाला याच्यावर अमानुष हल्ला करणाऱ्या मुजोर पोलिसांचे निलंबन होत नाही तोपर्यंत शांत राहणार नाही, संबंधित पोलिसांचे तात्काळ निलंबन करा, अशी मागणी माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते यांनी ट्विटरवरुन केली आहे.

संबंधित बातम्या : 

खासदार संभाजी छत्रपतींना राजीनामा मागितला नाही, राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही: प्रवीण दरेकर

आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकऱ्यांची अजित पवारांसोबत चर्चा, नेमकं काय ठरलं?

5 policemen suspended for beating BJP activist in Jalna