जालना : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरुन (Shikshak-Padvidhar Election) राज्यातील राजकारण तापलेलं असताना जालना (Jalna) जिल्ह्यातून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आलीय. टीम इंडियाचा अंडर 19चा माजी कर्णधार विजय झोलवर (Vijay Zol) गुन्हा दाखल झालाय. विजय झोल हा शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा जावई असल्याची माहिती मिळत आहे. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारातून उद्योजक किरण खरात यांना पिस्तूल दाखवून धमकवल्याचा आरोप विजय झोलवर करण्यात आलाय. संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर जालना जिल्ह्यात खळबळ उडालीय. एका माजी मंत्र्याच्या जावयावर अशाप्रकारचे आरोप करण्यात आल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे,
टीम इंडियाचा अंडर 19चा माजी कर्णधार तथा शिंदे गटातील नेते अर्जुन खोतकर यांचा जावई विजय झोलवर एका तरुण उद्योजकाला गुंडांद्वारे पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
जालन्यातील घनसावंगी पोलीस ठाण्यामध्ये उद्योगपती किरण खरात आणि त्यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय.
क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून विजय झोल यांनी गुंतवणूक केली, ज्यात या क्रिप्टो करन्सीचा मार्केट व्हॅल्यू घसरल्याने आपल्याला त्यात दोषी धरून क्रिकेटर विजय झोल आणि त्यांच्या भावाने घरी येऊन जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारदार किरण खरात यांनी केलाय.
पोलिसांनी या प्रकरणी क्रिकेटर विजय झोल आणि त्याचा भाऊ विक्रम झोल याच्यासह 15 जणांवर घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, या प्रकरणी विजय झोल याची या सगळ्या प्रकरणावर नेमकी काय भूमिका आहे? ते अद्याप समजू शकलेलं नाहीय.
दुसरीकडे संबंधित प्रकरणावरुन काँग्रेस आमदार कैलास गौरंट्याल यांनी खोतकर आणि झोल कुटुंबियांवर गंभीर आरोप केले आहेत. खोतकर आणि झोल कुटुंबियांनी घनसावंगी तालुक्यातील मंगरुळ येथील किरण खरात यांची सुपारी दिल्याचा, गंभीर आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला.
खोतकर आणि झोल यांच्यावर गुन्हे दाखल करा, मोक्का लावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचं वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केलं. कैलास गोरंट्याल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन खोतकर आणि झोल कुटुंबियांवर गंभीर आरोप केले.