Chhagan Bhujbal Speech on OBC : छगन भुजबळ यांच्या भाषणातील 5 मुद्दे अन् 1 निशाणा…

| Updated on: Nov 17, 2023 | 3:54 PM

Chhagan Bhujbal Full Speech in OBC Elgar Mahasabha : जालना जिल्ह्यातील अंबडमध्ये आज ओबीसी एल्गार महासभा पार पडली. या महासभेत छगन भुजबळ यांनी दमदार भाषण केलं. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेट निशाणा साधलाय. भुजबळांच्या भाषणातील पाच महत्वाचे मुद्दे, वाचा...

Chhagan Bhujbal Speech on OBC : छगन भुजबळ यांच्या भाषणातील 5 मुद्दे अन् 1 निशाणा...
Chhagan Bhujbal
Follow us on

सागर सुरवसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी | 17 नोव्हेंबर 2023 : जालना जिल्हा… जिथून मराठा आरक्षणाचा लढा पुन्हा उभा राहिला. तिथंच आज ओबीसी एल्गार महासभा पार पडली. जालन्यातील अंबडमध्ये आज ओबीसी एल्गार महासभा झाली. या महासभेला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी संबोधित केलं. भुजबळांनी जालन्यातील अंबडमधून मनोज जरांगे पाटील यांच्यावर थेट निशाणा साधला. तसंच आता ही लढाई अधिक तीव्र होणार असल्याचा इशाराच दिला… छगन भुजबळ यांनी वेगवेगळे मुद्दे मांडले. या मुद्यांमधून जरांगेंवर टीका केली. छगन भुजबळांच्या भाषणातील मुद्दे अनेक पण निशाणा एक- मनोज जरांगे पाटील… भुजबळांच्या भाषणातील पाच मुद्यांचा आढावा घेऊयात…

1. जशास तसं उत्तर

मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर एकाही नेत्याला गावात फिरकू देणार नाही, अशी भूमिका मराठा समाज आणि मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. यावर छगन भुजबळ यांनी निशाणा साधला. गावात नेत्यांना गावबंदी करता.. काय महाराष्ट्राचा सातबारा तुमच्या नावावर आहे काय?, असा सवाल भुजबळांनी केला. यापुढे जशास तसं उत्तर दिलं जाईल, असं छगन भुजबळ म्हणालेत.

2. “आमची लेकरंबाळं नाहीत का?”

मनोज जरांगे पाटील आपल्या भाषणात वारंवार आपल्या लेकराबाळांसाठी लढा दिला पाहिजे, असं आवाहन मराठा समाजाला करताना दिसतात. त्यावर भुजबळांनी निशाणा साधला आहे. आमची लेकरंबाळं, आमची लेकरंबाळं… मग बाकीच्यांची लेकरंबाळं नाहीत का रे बाबा… हे म्हणतात, भुजबळ दोन वर्ष बेसन भाकर खाऊन आला तुरुंगात, हो आलो. अरे छगन भुजबळ दिवाळीतही बेसन भाकर आणि कांदा फोडून खातो. पण स्व कष्टाचं खातो. तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही, असं म्हणत छगन भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे.

3. “तुझं खातो का रे?”

मार्च 1994 मध्ये जीआर निघाला, आम्हाला आरक्षण मिळालं… पण हे वारंवार म्हणतात की कुणाचं खाता कुणाचं खाता… का? तुझं खातो का रे?, असा सवाल छगन भुजबळांनी मनोज जरांगे यांना केलाय.

4. “नुसतं लेकरं , लेकरं करू नका… वेगळं आरक्षण घ्या…”

राज्याचे कितीतरी नेते मराठा झाले. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, विलासराव देशमुख, शंकरराव चव्हाण. किती तरी मराठे नेते. पण कुणी घरे जाळण्याची भूमिका नाही ठेवली. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका ठेवली. आजही मराठा नेते आहेत. मराठा तरुणांना सांगायचं अरे याच्या कुठे नादी लागलाय. या दगडाला शेंदूर लावून हा कुठे देव झालाय तुझा. याला कळना न वळणा,… नुसतं लेकरं लेकरं करतो. आमचीही लेकरं आहे. घ्या ना वेगळं आरक्षण…., असं म्हणत भुजबळांनी जरांगेंवर निशाणा साधला आहे.

5. जातीनिहाय जनगणना

जातनिहाय जनगनणा झाली पाहिजे, अशी मागणी भुजबळांनी केली. हा पहिला आणि शेवटचा मेळावा नाही. तर जिल्ह्यात, तालुक्यात सभा घेतल्या पाहिजेत. नरेंद्र मोदी, राहुल गांधी म्हणतात ओबीसी समाज आपला. 60 टक्के ओबीसी भाजपाला मतदान करतात. मग जर ओबीसीचा विचार होत नसेल तर 60 टक्के उद्या मतदान केले नाही तर?, असं भुजबळ म्हणालेत.