जालना : मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमकपणे आंदोलन केलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझा एनकाऊंटर करायचा असून माझ्याविरोधात फडणवीस षडयंत्र रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा कट असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीसांवर केले आहेत. अशातच यावर देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंच्या आरोपावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस साताऱ्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते, त्यावेळी पत्रकारांनी जरांगे यांनी केलेल्या आरोपावर बोलताना, जरांगे काय बोलले ते ऐकून मी यावर बोलेल असं फणडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस आता काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळावरून देवेंद्र फणडवीस यांच्यावर आरोप करत मुंबईमध्ये सागर बंगल्याच्या दिशेने येण्याचा निर्णय घेतला आहे. जरांगे पायी निघाले होते पण गेल्या पंधरा ते सोळा दिवसांपासून ते उपोषण करत असल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. मराठा बांधव त्यांना मुंबईला जावू नक अशी विनंती करत आहेत. मात्र जरांगे आता गाडीमध्ये बसले असून ते सागर बंगल्यावर येण्यासाठी ठाम आहेत.
मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप गंभीर असून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मात्र भाजप नेत्यांनीही आता आक्रमक भमिका घेतलेली पाहायला मिळत आहे.
नारायण राणे आणि अजय बारसकर यांच्या मागे देवेंद्र फडणवीस आहे. फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मी पायी जाऊन आंदोलन करणार आहे. फडणवीस यांच्यामुळेच सगेसोयऱ्याची अंमलबजावणी अजून झालेली नाही. त्यांनी सांगितले तर एका मिनिटांत त्यांची अंमलबजावणी होईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.