जालना : मागच्या 17 दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण अखेर काल मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतलं. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले होते. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावं, अशी मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: काल आंतरवाली सराटी गावामध्ये गेले होते. त्यांच्याहातून ज्यूस पिऊन मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडंलं. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने एक महिन्याची मुदत मागितली होती. जीआर काढला, तर तो कोर्टात टिकणार नाही असं सरकारच म्हणण होतं. आम्हाला टिकणार आरक्षण द्यायच आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे सरकारला एक महिन्याची मुदत देत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतलं असलं, तरी अजूनही ते आंदोलन स्थळी बसले आहेत. तिथे त्यांनी टीव्ही 9 मराठीच्या प्रतिनिधीशी संवाद साधला. उपोषण मागे घेतलं असलं, तरी आंदोलन सुरुच राहणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही असा मनोज जरांगे पाटील यांनी निर्धार केलाय. त्यांनी राज्य सरकारला 40 दिवसाचा वेळ दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सोडल असलं, तरी त्यांचं साखळी उपोषण सुरु राहणार आहे. “सरकारने जी मुदत मागितली होती, जाहीरपणे महाराष्ट्रासमोर सरकारने एक महिन्याची मुदत मागितली. ती मुदत मराठा समाजाने दिली आहे. एक महिना आरक्षणाबाबत काही बोलणार नाही. आरक्षण देण्यासाठी त्यांनी कशी तयारी करावी? काय करावी? कसं आक्षण द्यायचं? पुरावे कसे आणायचे? ते सरकार ठरवेल. मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपण द्यायची जबाबदारी सरकारची आहे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘आरक्षणाशिवाय स्वस्थ बसणार नाही’
आमरण उपोषणाचा आता साखळी उपोषणात रुपांतर केल्याच त्यांनी सांगितलं. “मुख्यमंत्री मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मनोज जरांगे पाटील तुम्ही आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसाल, तर मी सुद्धा आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.