मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगेंवर करण्यात आला आहे. या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या सुनावणीला जरांगे पाटील कोर्टात हजर राहणार आहेत. 2 ऑगस्टला पुण्याच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर मनोज जरांगे पाटील हजर राहणार आहेत. न्यायालयात हजर राहण्यासाठी मनोज जरांगे पाटील उद्या पुण्याकडे निघणार आहेत. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांनी हे वॉरंट काढलं आहे. अटक वॉरंट काढल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे देखील अॅक्शन मोडमध्ये आहेत. न्यायालयात हजर राहण्यासाठी मनोज जरांगे पाटील उद्या दुपारी पुण्याकडे निघणार आहेत.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगेंवर करण्यात आला आहे. त्यानंतर मनोज जरांगेंना न्यायालयात हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र दिलेल्या तारखेला हजर न राहिल्याने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात पुणे न्यायालयाने अटकच वॉरंट काढलं होतं.
छत्रपती संभाजीराजे यांच्या नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर यांच्याविरोधात फसवणूक आणि अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
मनोज जरांगे पाटील आणि आणखी दोघांच्या विरोधात याबाबत वारजे येथील धनंजय घोरपडे यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावलं होतं. मात्र आंदोलनामुळे जरांगे पाटील न्यायालयात हजर राहिले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे. उद्या जालन्यातून पुण्याला जाण्यासाठी मनोज जरांगे पाटील निघतील. त्यानंतर पुण्यातील न्यायालयात नेमकं काय घडतं? जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंटचं पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे.