संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, अंतरवली सराटी जालना | 22 फेब्रुवारी 2024 : मराठा समाजाला आरक्षण मिळावं. यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा 13 वा दिवस आहे. मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळत नाही, तोवर उपोषण मागे घेणार नाही, अशी जरांगेंची भूमिका आहे. पण काल मनोज जरांगे यांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित केले गेले.किर्तनकार आणि मनोज जरांगे यांचे जिवलग मित्र अजय महाराज बरासकर यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. या आरोपांना मनोज जरांगे यांनी आज उत्तर दिलं.
आज माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. अजय महाराज बरासकर यांच्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं. अजय बरासकर हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका प्रवक्त्याचा मोठा ट्रॅप आहे. यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही एक नेता आहे, असं मनोज जरांगे म्हणालेत. बारसकरने बोलताना एक शब्द वापरला आहे. तो मराठा बांधवांनी आणि आपण सगळ्यांनी लक्षात ठेवा. तो म्हणाला की, तुकाराम महाराजांसाठी माझं मरण आलं तरी चालेल. एक बळी असा राहिल की जो तुकाराम महाराजांसाठी मेला. न्याय देण्यासाठी मेला. पण हा न्याय देण्यासाठी मरणाऱ्यातला नाहीये. याची सगळी हिस्ट्री माझ्याकडे आलीय, असं मनोज जरांगे म्हणाले.
एक कोणतंतरी संस्थान आहे. त्याच्या नावाखाली याने लोकांकडून 300 कोटी रूपये जमा केलेत. याचं मूळ गाव वेगळं आहे. भिशी घेऊन पळून गेला हा दुसऱ्या गावात गेला. जरांगेंवर आरोप करायचे आणि तुकाराम महाराजांचं नाव घेऊन मरतो म्हणायचं पण तू तुकाराम महाराजांसाठी नाही मरायला लागला. तू त्या महाराज शब्दासाठी डाग आहेस. तू इतके कुटाणे केलेत की तू मरणारच आहेस. असं मरण्यापेक्षा याला तुकाराम महाराजांचं नाव घेऊन सहानुभूती घेऊन मरायचं आहे, असंही मनोज जरांगे म्हणाले.
पुढच्या आंदोलनावरही जरांगेंनी भाष्य केलं. तीन मार्चला रास्तारोको होणार आहे. हा रास्तारोको शांततेत होणार आहे. तीन मार्चला असणारे लग्न सोहळे संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे.