सरकारकडून टोलमाफीची घोषणा होताच जरांगे आक्रमक; म्हणाले, फक्त मुंबईतील लोकच…

| Updated on: Oct 14, 2024 | 3:47 PM

Manoj Jarange Patil on Toll waiver : मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे सरकारच्या टोलमाफीवर भाष्य केलं आहे. त्यांनी शिंदे सरकारच्या निर्णायावर टीका केली आहे. मनोज जरांगे काय म्हणाले? वाचा सविस्तर......

सरकारकडून टोलमाफीची घोषणा होताच जरांगे आक्रमक; म्हणाले, फक्त मुंबईतील लोकच...
Follow us on

आज झालेल्या शिंदे सरकारच्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत टोलमाफीचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत प्रवेश करताना लागणाऱ्या वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोलनाक्यांवर संपूर्णपणे टोल माफी देण्यात आली आहे. टोलमाफीच्या या निर्णयावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टीका केली आहे. त्यांना काय मुंबईतील लोक मतदान करतात का? महाराष्ट्रामधील लोक त्यांना मतदान करत नाहीत का? सर्वच टोलनाके सर्वच फ्री करून, गोरगरिबांचे कल्याण होऊ द्या, असं मनोज जरांगे म्हणालेत.

मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे काय म्हणाले?

आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणावर चर्चा झालेली नाही. यावरही जरांगेंनी भाष्य केलं आहे. मराठा आरक्षणवर चर्चा होणार आहे. मराठा आरक्षणाच्या सर्व मागण्यांची अंमलबजावणी होणार, त्या शिवाय ते आचारसंहिता लावणार नाहीत. नारायण गडावरचा दसरा मेळावा बघून त्यांचे डोळे उघडले असतील. मराठा समाज त्यांच्या पाठीशी होता. पण आता मुस्लीम, दलित, गोरगरिब ओबीसीदेखील विरोधात आहेत, असं मनोज जरांगे म्हणालेत.

आजच त्यांच्या विरोधात साडेतीन कोटी समाज विरोधात गेला आहेत. मी शंभर टक्के सांगतो ते कॅबिनेट घेणार आहेत. मराठ्यांच्या मागण्यांची अंमलबजावणी करणार आहेत. मराठ्यांवर ते अन्याय करणार नाहीत. ज्यांची मागणी नाही त्या पंधरा जातींना मराठ्यांच्या नाकावर टिचून आरक्षण दिले आहे, असं जरांगे म्हणाले.

विधानसभा निवडणुकीवर जरांगे काय म्हणाले?

लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे. येत्या दोन दिवसात निवडणुकीची घोषणा होऊ शकते. आगामी विधानसभा निवडणुकीवरही जरांगेंनी भाष्य केलं. भाजप, शिवसेना, काँगेस आणि शिवसेना यांच्या विरोधात मराठा गेला आहे. आरक्षण दिले नाही तर यांचे पूर्ण पाडतो, यांना अस्मान दाखवणार आहोत. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा सांगतो आम्हाला राजकारण करायचे नाही. खुर्च्या तुम्हीच सांभाळा. तुमची मजा तुम्हीच करा. मराठ्यांच्या विरोधात फडवणीस यांनी जाऊ नये. नाहीतर मराठा समाज तुम्हाला असमान दाखवल्या शिवाय राहणार नाही, असं जरांगे म्हणाले.