जालना | 14 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत असणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दहा मिनिटे चर्चा झाली. या चर्चेत काय बोलणं झालं. याबाबत जरांगे पाटील यांनी माहिती दिली. आपण मराठा आरक्षणासाठी उपोषण करत आहोत. एखाद्या आंदोलनाच्या ठिकाणी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषण सोडण्यासाठी चर्चा केल्याची पहिलीच घटना आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडतंय. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचं अभिनंदन, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या संबोधनाला सुरुवात केली.
मराठा आरक्षण हा तुमच्या आणि माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. 29 तारखेला आपलं आंदोलन सुरु झालं. तेव्हापासून मी सांगत होतो की, आपल्याला कुणी न्याय देऊ शकेन तर फक्त आणि फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच… आणि आज त्यांनी तो विश्वास सार्थ ठरवला. आज ते या ठिकाणी आले. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणालेत. मला विश्वास आहे ते आपल्याला न्याय देतील. फक्त टिकणारं आरक्षण आम्हाला द्या. आमच्या समाजाला त्याचा उपयोग होईल, असं मनोज जरांगे म्हणाले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे मागच्या 17 दिवसांपासून उपोषण करत आहेत. त्यांनी सरकार समोर पाच अटी ठेवल्या होत्या. या अटींची पूर्तता करावी. मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांनी स्वत: उपस्थित राहून आपल्याला आश्वासन द्यावा, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. त्यानुसार आज मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित राहात मनोज जरांगे पाटील यांना आणि मराठा समाजाला आश्वस्त केलं आहे. यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हातून ज्यूस घेत जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आहे.
मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना आश्वस्त केलं. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ म्हणत शिंदे यांनी आपल्या संबोधनाला सुरूवात केली. यावेळी मीही सामान्य कुटुंबातून आलेलो आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मी प्रयत्न करत राहील, असं एकनाथ शिंदे म्हणाले.