संजय सरोदे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी अंतरवाली सराटी, जालना | 23 ऑक्टोबर 2023 : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. या 40 दिवसात सरकारने मराठा आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं होतं. या अल्टिमेटममधील केवळ एक दिवस शिल्लक आहे. उद्या सरकारला दिलेला वेळ संपतो आहे. मात्र अद्याप सरकारकडून याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यावरून मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. जरांगे पाटील यांनी राज्य सरकार आणि मुखमंत्री एकनाथ शिंदे यांना अंतिम आवाहन केलं आहे.
सरकारच्या वतीने आम्हाला अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नाही. पण आम्हाला असं वाटतं आज किंवा उद्या शंभर टक्के आरक्षण मिळेल. काल मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की, आम्ही शब्द दिलेला आहे आणि त्यांनी काल दिलेला शब्द मराठ्यांना अपेक्षित होता. मात्र आता सरकारला एक तासही वाढवून मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शेवटची विनंती आहे की, मराठा समाजाला शब्द दिल्याप्रमाणे आरक्षण दिलं पाहिजे. त्यांनी त्यांच्या शब्दाला डाग लागू देऊ नये, असं जरांगे पाटील म्हणालेत.
मुख्यमंत्री शब्दाला पक्के आहेत. त्यांचा मान सन्मान राखून मराठ्यांनी मुख्यमंत्र्यांना वेळ दिलेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 24 तारखेच्या आत आरक्षण जाहीर करावं. मुख्यमंत्री शब्दाला पक्के आहेत आणि त्यांची प्रतिमा कमी होऊ नये, असंही मनोज जरांगे पाटील म्हणालेत.
नेत्यांना गाव बंद केले नाही, फक्त आमच्या गावात यायचं नाही, असं म्हटलं आहे. तुम्ही आम्हाला आपलं मानत नाहीत. मग तुम्ही आमच्या गावात कशाला येता? येऊ नका. मराठे तुमच्या दारात उभे राहणार नाहीत. तुम्हीही आमच्या दारात उभं राहू नका. तुम्हाला गावात यायचं असेल तर आरक्षण घेऊनच या, असा सज्जड इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
ओबीसी नेते तायवाडे यांनी ईडब्ल्यूएसवर मराठा समाजाने समाधानी राहण्याचं वक्तव्य केलं होतं. त्यावरही जरांगे पाटील यांनी उत्तर दिलं आहे. समाधानी राहायचं का नाही ते आम्ही ठरवू, असं प्रत्युत्तर जरांगे पाटील यांनी दिलं आहे.