मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मागच्या सात दिवसांपासून उपोषण करत आहेत. जालन्यातील अंतरवली सराटीत त्यांचं उपोषण सुरु आहे. आज या उपोषणाच्या सातव्या दिवशी आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे अंतरवली सराटीमध्ये पोहचले आहेत. संभाजीराजे उपोषणस्थळी येत मनोज जरांगेंच्या तब्येतीची चौकशी केली आहे. या उपोषणस्थळावरून संभाजीराजे यांनी सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगेंना काही झालं तर सरकार जबाबदार असेल, असा इशारा संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे.
मनोज जरांगे पाटील हे या वर्षात सहाव्यांदा आंदोलन आणि आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यातील इतिहासातील शरमेची बाब आहे. एक व्यक्ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावायला बसला आहे. त्याची दखल किंबहूना त्यावरचा निर्णय या सरकारने घेतलेला नाही. मी डॉक्टर्सकडून सर्व रिपोर्ट घेतले आहेत. परवा रायगडवर मी गेलो होतो. त्यावेळी मला कळलं की मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे मी त्यांना पाहण्यासाठी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो आहे. मनोज जरांगेंचा जीव तुमच्यासाठी आहे. त्यांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी त्यांना पाहायला आलोय. मला दु:खी वाटतं. वेदना होत आहे. एवढी तब्येत खालावूनही… आता तर त्यांनी सलाईन घ्यायचं बंद केलं आहे, असं संभाजीराजे म्हणाले.
सरकार निवांत मुंबईत एअर कंडिन्शन्स ऑफिसात बसले आहेत. विरोधी पक्षातील नेतेही बघ्याची भूमिका घेत आहेत. हे चालणार नाही. हे तुमचं कॅबिनेट आहे ना… घ्याना निर्णय मग. हो की नाही बोलून टाका. ही काय पद्धत आहे. इथले मेडिकल रिपोर्ट जातात तिकडे. मेडिकल रिपोर्ट वाईट आहेत. काही होऊ शकतं. त्याला तुम्ही जबाबदार असणार आहात. मनोज जरांगेंना काय सांगायचं ते सांगितलं. तब्येतीच्या बाबत चर्चा झाली. त्यांनी मला शब्दही दिलाय, असंही संभाजीराजे यावेळी म्हणाले.
मी पूर्वीही जरांगेंसोबत होतो. आजही आहे. उद्याही राहील. आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो. पण मला फोकस हलवायचा नाही. मी एक फोकस घेऊनच आलोय. तो म्हणजे मनोज जरांगे यांची तब्येत. तब्येत चांगली असेल तर सर्व गोष्टी करू शकतो. सरकारला सूचना आहे. मेडिकल रिपोर्ट घ्या. किडन्यांचं फंक्शनिंग काय आहे देव जाणे, लिवरचं फंक्शनिंग कसं आहे देव जाणे, ब्लड प्रेशर लो झालं आहे. याचं तुम्हाला जराही गांभीर्य नसेल तर सत्तेत राहून तुमचा उपयोग काय?, असा सवाल संभाजीराजेंनी सरकारला विचारला आहे.