जालना विधानसभा मतदारसंघात अर्जुन खोतकर यांना शिंदे सेनेने संधी दिली आहे. यापूर्वी अखंड शिवसेनेत ते चार वेळा आमदार होते. ते दोनदा मंत्री राहिले आहेत. 2019 मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला होता. सध्या पण त्यांच्या मागे शुक्लकाष्ठ लागलेले आहे. अर्जुन खोतकर यांनी निवडणूक अर्ज दाखल केला. त्यासोबत प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यानुसार, ते एकूण 11 कोटी 32 लाख 21 हजार 316 रुपये संपत्तीचे मालक आहेत. निवडणूक विभागाकडे दाखल शपथपत्रात नमूद केल्याप्रमाणे त्यांच्याकडे 2 कोटी 47 लाख 79 हजार 294 रुपयांची जंगम आणि 8 कोटी 84 लाख 42 हजार 22 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
गुरूवारी साधला पुष्यामृताचा मुहूर्त
गुरूवारी अनेक उमेदवारांनी पुष्यामृताचा मुहूर्त साधला. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात जालना विधानसभेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांचा समावेश होता. तर पैठणचे शिंदे सेनेचे शिलेदार विलास भुमरे, कैलास गोरंट्याल आणि कन्नडमध्ये उदयसिंह राजपूत, संतोष बांगर यांच्यासह अनेकांचा समावेश होता. शुभ मुहूर्त पाहत या उमेदवारांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यात त्यांनी संपत्तीची संपूर्ण माहिती दिली आहे.
शिंदे सेनेकडून उमेदवारी अर्ज
अर्जुन खोतकर यांनी जालना विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली आहे. गुरूवारी निवडणूक आयोगाकडे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यासोबत त्यांनी शपथपत्र पण दाखल केले आहे. त्यानुसार, खोतकर यांच्याकडे 2 कोटी 47 लाख 79 हजार 294 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यात एक कोटी 30 लाख 27 हजार 924 रुपयांची रोकड आहे. विविध बँकांमध्ये ठेवी आहेत. त्यांच्याकडे 1 लाख 53 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. त्यांच्या नावावर एकाही वाहनाची नोंद नाही. त्यांच्याकडे 8 कोटी 84 लाख 42 हजार 22 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यात शेतजमिनीसह घराचा समावेश आहे. तर खोतकर यांच्या नावे 1 कोटी 2 लाख 6 हजार 50 रुपयांचे कर्ज आहे.
पत्नीच्या नावे इतकी संपत्ती
अर्जुन खोतकर यांच्या पत्नी सीमा खोतकर यांच्या नावे 4 कोटी 17 हजार 485 रुपयांची मालमत्ता आहे. त्यात 79 लाख, 23 हजार 676 रुपयांची जंगम तर 3 कोटी 20 लाख 93 हजार 809 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे 9 लाख 96 हजार 356 रुपये आहे. त्यांच्याकडे 53 लाख 55 हजार रुपयांचे दागिने आहेत. तर काही शेतजमीनही आहे.