संजय सरोदे, प्रतिनिधी, अंतरवाली सराटी, जालना | 21 February 2024 : मराठा आरक्षणावरुन पुन्हा राज्यात रणकंदन होणार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कालच मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती. सरकारने त्यांचे आरक्षण मराठा समाजावर थोपविल्याचा आरोप त्यांनी केला होता. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणावर ते ठाम आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषदेत घेतली. त्यात अनेक विषयांवर ते व्यक्त झाले. हे सरकार जाणून बुजून उपोषणाची वेळ आणत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी राज्य सरकारवर केला आहे.
आम्हाला हवे ओबीसी आरक्षण
काल सरकारने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याचा विषय घ्यायला हवा होता. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवे आहे. हे सर्व निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आल्याचा आरोप जरांगे यांनी केला. शहाणे असतील तर त्यांनी कालच्या मॅटर वरून लक्षात घ्यावं, लोकांचा विश्वास आहे, सरकारने विश्वासघात करु नये. आम्ही वाशीत सांगितलं होतं की, गुलालाचा अपमान करू नका. त्यांनी स्वतः सांगावं कोण आरक्षण देऊ देत नाहीयेत. किंवा सांगावं की मीच देत नाहीये, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं
या सरकारने मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं, अशी टीका जरांगे यांनी सरकारवर केली. हैद्राबाद गॅझेट घेणं म्हणजे काय परदेशातील काम नाहीये. लय मोठा विषय नाहीये. तुम्ही लोकांना सांगण्यासारख केलं तरी काय? कालच्या अधिवेशनात जनतेचा फायदा व्हायला पाहिजे होता तुम्ही मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतलं. तुम्ही दोन्ही दिलं असतं ना तर, 15 दिवस तुमच्या अंगावरचा गुलाल निघाला नसता.त्यांना परत 106 सारखे निवडून आणायचे आहेत म्हणून असं करत आहेत. येवढं मोठा मुद्दा असताना निवडणुका घेऊच शकत नाहीत ते, असे जरांगे म्हणाले.
आता टप्प्या-टप्प्याने आंदोलन
आम्हाला सगे सोयरे अंमलबजावणी पाहिजे. आता टप्प्यांत आंदोलन होणार आहे. टप्प्यांशिवाय आंदोलन नाही. पहिल्याच टप्प्यात यांना दणका बसणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. रात्री वकिलांची टीम आली होती. मी आज उपचार घेईन म्हणून सांगितलं आहे. या आंदोलनाचा इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ न देण्याचे आवाहन त्यांनी केले. जरी रस्ता रोको केला तरी, या विद्यार्थ्यांना अगोदर जाऊ द्या. आम्ही असा कोणाला त्रास देत नाही. पण, एकदा सुरू केलं की, शेवटपर्यंत हटत नाही. अंमलबजावणी होईपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.