मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अंतरवाली सराटीत मोठा हायहोल्टेज ड्रामा सुरु आहे. मराठा आरक्षण आंदोलनाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानंतर त्याविषयीची बैठक घेण्यात आली. पण ही बैठक संपतानाच मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण करणार असल्याचे जाहीर केल्याने एकच हल्लकोळ उठला.
अंतरवाली सराटीत हायहोल्टेज ड्रामा
अंतरवाली सराटीत हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. बैठक संपत असतानाच मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांच्यामुळचे मराठा आरक्षणाला खोडा बसल्याचा आरोप जरांगे यांनी केला. मंचावरुनच त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली. त्यामुळे कार्यकर्ते भांबावले. त्यात महिलांनी आक्रोश सुरु केला. जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण करु नये अशी त्यांना विनवणी करु लागल्या. काही महिल्यांच्या डोळ्यांना पाणी आले. काही जणी रडू लागल्या. कार्यकर्त्यांना पण भडभडून आले. त्याचवेळी जरांगे पाटील जागेवरुन उठले त्यांनी बैठक संपल्याचे जाहीर केले.
पण कार्यकर्ते मंचासमोरुन हटायला तयार नव्हते. त्यांनी जरांगे पाटील यांना उपोषणाचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. पण फडणवीस मुद्दामहून त्रास देत असल्याचे ते म्हणाले. मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी ते प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आता आरपारची लढाई होणार असल्याचे ते म्हणाले.
आता आरपारची लढाई
मनोज जरांगे यांनी यावेळी आरपारची लढाईचा इशारा दिला. आपण समाजाला शब्द दिला आहे. कुणाचं कुटुंब उघड पडू देणार नाही. आता 29 सप्टेंबरापासून उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. उपोषणाने आरक्षण मिळवायचं आणि आमदारही पाडायचे असे आवाहन त्यांनी केले. काही झाले तरी आता देवेंद्र फडणवीस यांची जिरवणारच असा इशारा त्यांनी दिला. विरोध करणारे भाजपचे आमदार पाडायचे म्हणजे पाडायचेच असे ते म्हणाले. फडणवीसांनी मुद्दाम समाजाला वेठीस धरल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारकडे 29 सप्टेंबरपर्यंत वेळ असल्याचे त्यांनी जाहीर केले. एक वर्षात माझ्या समाजाचा तोटा झाल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आता आरपारची लढाईचा इशारा त्यांनी दिला.