मनोज जरांगे यांच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे. अंतरवाली सराटीत आज ते उमेदवारांची घोषणा करणार आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या फडात एकच रंगत येण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीला या नव्या आघाडीचा किती फटका बसतो हे लवकरच समोर येईल. पण लोकसभेला मराठा फॅक्टर निर्णायक ठरल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्वच पक्ष जरांगेंच्या भूमिकेकडे गांभीर्याने पाहात आहेत, हे विशेष. आज सकाळी अंतरवाली सराटीत त्यांनी यासंबंधीची रूपरेषा मांडली.
फडणवीस यांच्यावर पुन्हा टीका
मी नवीन आहे. त्यामुळे जागांबाबत वेळ लागतोय. एकदोन प्रश्न किचकट आहे. काल मी सर्वांना सांगितलं आहे. माझा समाज एकगठ्ठा राहील. इतरांचं मी काही सांगत नाही. मला काही माहीत नाही. मी त्यांच्या खांद्यावर मान टाकू शकतो. पण आमचे मराठे १०० टक्के एकत्र राहणार आहे, असा दावा त्यांनी केला. आम्हाला फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बेजार केलं म्हणून लढत आहोत. आम्हाला नाद नाही. आम्हाला कुणाची तरी जिरवायची आहे. त्यालाच मराठा म्हणतात, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.
थोडेफारच उमेदवार देणार
आपल्याला थोडेफारच उमेदवार द्यायचे आहेत. आपल्याला आधार पाहिजे. राजकारणाचं वेड लागू देऊ नका. आमदार, खासदार होण्याची स्वप्न पाहू नका. एखाद्या जिल्ह्याला जागा दिली तर पूर्ण जिल्ह्याने काम करायचं. आणि गुलालच घेऊनच यायचं. एक एक का होईना पण तो आधार होईल. तो विधानसभेत भांडेल. आपले मुद्दे मांडेल. आपल्याला समाजाची नाराजी ओढवून घ्यायची नाही. निवडून येणार्या जागांवर चर्चा करू. मुस्लिम आणि आंबेडकरी नेते येतील त्यांच्या जागा सांगतील. त्यावर चर्चा करू. कमीत कमी १० ते १५ आपल्या हक्काचे आहेत, हे म्हणायला होईल. २०० लडून पडण्यात अर्थ नाही. आपल्याला शत्रू खूप आहेत, असे ते म्हणाले.
जातीसाठी आम्हाला आधार करायचा आहे
आम्हाला गरीब मराठ्यांना हक्काचा अधिकार करायचा आहे. त्यांना चार उंबरे घर हक्काचं करायचं आहे. मराठ्यांचे १५० ते २०० आमदार आहेत. पण आम्हाला आधार नाही. आम्हाला दार उघडं नाही. आम्हाला आमचा हक्काचा आमदार पाहिजे. आमचा म्हणून काम सांगायचं आहे. माझी काही इच्छा नाही. मला यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी एक तरी माणूस द्यायचा आहे. उमेदवारी नाही मिळाली तरी नाराज होऊ नका. जात बघा. खूप जण आले. वगैरे वगैरे भरपूर नेते भेटायला आले. सर्वच पक्षाचे लोक आले होते, असे त्यांनी सांगितले.