विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जालन्यातील अंतरवली सराटीत आज महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मनोज जरांगे आणि मराठा समाज बांधव विधानसभा लढायची की नाही याबाबत निर्णय घेणार आहेत. आज सकाळी 11 वाजता ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मराठा समाज बांधवांशी चर्चा करून मनोज जरांगे पुढची दिशा ठरवणार आहेत. या बैठकी आधी मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत काल विधानसभा निवडणूक संदर्भात आणखी एक बैठक झाली. तज्ञ, राजकीय अभ्यासक, वकील, निवृत्त अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत जरांगेंनी बैठक घेत निवडणुकीसंदर्भात चर्चा केली.
मनोज जरांगे यांनी या बैठकी आधी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. आता पडघम कशाचे आहेत हे सर्वांना माहित आहे. गोरगरिबांच्या न्यायासाठी जनतेला एकत्र यावं लागणार आहे. शेवटी शेतकरी अडचणीत सापडला आहे. सामान्य जनता अडचणीत सापडले आहे. तेव्हा आपण चर्चा केली पाहिजे. जे वरिष्ठ आहेत जेष्ठ आहेत, त्यांना अनेक वर्षांचा अनुभव आहे. त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे, असं जरांगे म्हणाले.
मनोज जरांगे पाटील आणि खलील-उर-रहमान सज्जाद नौमानी यांची छत्रपती संभाजीनगरमध्ये भेट झाली. मौलाना सज्जाद नौमानी हे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे प्रवक्ते आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये या दोघांची भेट झाली. सज्जाद नौमानी यांनी मुस्लीम समाजाला जरांगेंनी उभं केलेल्या उमेदवाराला किंवा जरांगेंच्या बाजूने मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. या बैठकीवरही जरांगेंनी प्रतिक्रिया दिली.
नौमानीसाहेब हे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. ज्येष्ठ आहेत. त्यांचं मार्गदर्शन घेणं, हे मला आवश्यक वाटलं. म्हणून मी त्यांचं मार्गदर्शन घेतलं. न्यायाच्या प्रतिक्षेत असलेला समाज जिथे मानवतावादी असतो. तिथे जात लावून चालत नाही. त्यामुळे मानवतावाद जागा ठेवणं महत्त्वाचा आहे. नौमानीसाहेब हे मोठे विचारवंत आहेत. त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांचं प्रचंड मार्गदर्शन मिळालं. त्यामुळे आता या निवडणुकीत काहीही होऊ शकतं, असं जरांगे म्हणालेत.