राज्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीत मनोज जरांगे पाटील उमेदवार देत आहेत. कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार असेल? याची मनोज जरांगे पाटील आज संध्याकाळी घोषणा करणार आहेत. त्याआधी जरांगेंनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी मराठा समाजाला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. जिथे ताकद आहे तिथे जोर लावायचा. जिथे ताकद नाही तिथे उमेदवार पाडायचा. फक्त एससी एसटीच्या उमेदवारांना मराठ्यांचं मतदान करायचं आहे. आम्ही बाँड लिहून घेणार, व्हिडिओग्राफी करून घेणार. पण ते व्हायरल करणार नाही. कारण कुणाला अडचणीत आणणार नाही. आता आम्ही मतदारसंघाबाबत चर्चा करणार आहे. निवडून येणार तेवढेच लढणार. इच्छा अनेकांची असते. आपल्याला समाज जपायचा आहे. राजकारणाच्या नादात समाज हरता कामा नये. एक दोन दिवस माझ्यावर नाराज व्हायचं तर व्हा. पण पडून अपमान सहन करण्याची ताकद आपल्यात नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.
जातीसाठी आम्हाला आधार करायचा आहे. आम्हाला गरीब मराठ्यांना हक्काचा अधिकार करायचा आहे. त्यांना चार उंबरे घर हक्काचं करायचं आहे. मराठ्यांचे १५० ते २०० आमदार आहेत. पण आम्हाला आधार नाही. आम्हाला दार उघडं नाही. आम्हाला आमचा हक्काचा आमदार पाहिजे. आमचा म्हणून काम सांगायचं आहे. माझी काही इच्छा नाही. मला यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी एक तरी माणूस द्यायचा आहे. उमेदवारी नाही मिळाली तरी नाराज होऊ नका. जात बघा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं आहे.
खूप जण आले. वगैरे वगैरे भरपूर नेते भेटायला आले. सर्वच पक्षाचे लोक आले होते. कुणाकडून राजीनाम्याचे बाँड लिहून घेतले नाही. आम्ही इतक्या खालच्या थराला जात नाही. कुणाला जायचं तर जाऊ द्या. काही म्हणाले व्हीप पाहिजे. मी नाही म्हटलं. मराठे हेच व्हीप आहे, असं जरांगे म्हणाले.
मी नवीन आहे. त्यामुळे जागांबाबत वेळ लागतोय. एकदोन प्रश्न किचकट आहे. काल मी सर्वांना सांगितलं आहे. माझा समाज एकगठ्ठा राहील. इतरांचं मी काही सांगत नाही. मला काही माहीत नाही. मी त्यांच्या खांद्यावर मान टाकू शकतो. पण आमचे मराठे १०० टक्के एकत्र राहणार आहे. आम्हाला फडणवीस यांनी बेजार केलं म्हणून लढत आहोत. आम्हाला नाद नाही. आम्हाला कुणाची तरी जिरवायची आहे. त्यालाच मराठा म्हणतात, असंही जरांगे यावेळी म्हणाले.