मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा हुंकार भरला आहे. लोकसभा निवडणुकीमुळे त्यांनी आंदोलनाला ब्रेक दिला होता. त्यानंतर सरकारच्या यशस्वी शिष्टाईने त्यांचे आमरण उपोषण स्थगित झाले. त्यातच आता अंतरावाली सराटीजवळील वडीगोद्रीत ओबीसी आरक्षणात वाटेकरी नको म्हणून आमरण उपोषण सुरु झाले आहे. जालना जिल्हा पुन्हा एकदा राज्याच्या नकाशावर आला आहे. आता मराठा समाजाची फसवणूक कराल तर त्याचे परिणाम भोगण्यास पण तयार राहा, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.
तुम्हाला आमचे वाटोळे करायचे आहे का?
आज माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना धारेवर धरले. तुम्हाला आमचे वाटोळे करायचे आहे काय़ असा रोकडा सवाल त्यांनी केला. मग न्यायाधीश कशाला पाठवले होते. त्यावेळी सगळे सोयरे आणि सर्व विषयावर मार्गी लागतील असे सांगायचे, आम्हाला सग्या-सोयऱ्याची जी व्याख्या दिली आहे त्याप्रमाणे आरक्षण पाहिजे, असे ते म्हणाले.
मग तुमचा कार्यक्रम होणार
तुम्ही किती फसवा मी मराठा समाजाला ओबीसींमधूनच आरक्षण देणार आणि तुम्ही आरक्षण दिले नाही तुम्हाला संपवणार आणि हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवावे. तुम्ही गोड बोलून फसवता का? आणि कार्यक्रम करता का? तुम्ही अगोदर फसवायचे पण तुमचा कार्यक्रम होत नव्हता, यापुढे तुमचा कार्यक्रमच होईल, असा इशारा त्यांनी दिला.
तर आंदोलन बंद होणार नाही
मराठा आंदोलनाची दिशा सुद्धा जरांगे पाटील यांनी सांगितली. त्यांनी त्यासाठीची अट सुद्धा राज्य सरकारपुढे ठेवली. मी सग्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाल्यानंतर जीआर बघणार आहे, की ज्याची नोंद झाली आणि त्याच्या सग्या सोयऱ्याला आरक्षण मिळालं तरच मी आंदोलन बंद करणार आहे. नाही तर मी आंदोलन बंद करत नसतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात केली चाचपणी
आगामी विधानसभा निवडणुकीबाबत त्यांनी मोठे भाष्य केले आहे. आम्ही दोन टप्प्यात पाहणी, चाचणी केलेली आहे त्यामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भागात आम्ही चाचणी केली हे खरे आहे. सरकार असेच करत राहिले तर 288 उभे करायचे की पाडायचे,याचा आम्हाला विचार करावा लागणार आहे. पहिल्या टप्प्यात 24 विधानसभा आणि दुसऱ्या टप्प्यात 43 विधानसभा अशी चाचणी झाल्याचे ते म्हणाले. कोणी जर आम्हाला फसवल त्यांना आम्ही कायमचे घरी पाठवू असा इशारा त्यांनी दिला.
6 जुलैपासून दौरा
मनोज जरांगे पाटील यांना आज गॅलेक्सी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटल्यानंतर ते बीड जिल्ह्यातील चाकरवाडी येथे होणाऱ्या एका धार्मिक सप्ताहास भेट देणार आहेत. यावेळी जरांगे पाटील यांना प्रवास करताना त्रास होत असल्याचे जाणवले. ६ जुलैपासून ते 13 जुलै पर्यंत मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मराठा समाजाशी संवाद साधणार, असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.