मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पाचव्यांदा उपोषणाला बसले आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे ही त्यांची आग्रही मागणी आहे. शनिवार, 20 जुलैपासून ते आमरण उपोषणाला बसले आहेत. अंतरवाली सराटीत त्यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. त्यातच भाजप नेत प्रवीण दरेकर हे त्यांच्या निशाण्यावर आले आहेत. दरेकर यांच्या टीकेनंतर आज त्यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच दरेकर आणि इतर नेत्यांना मराठा आरक्षणाविरोधात फूस लावत असल्याचा गंभीर आरोप जरांगे पाटील यांनी केला.
तुमच्या अंगात सत्तेची मस्ती
मुलीच्या डोळ्यातल्या पाण्याला भंप्पकपणा म्हणत आहात. तुमच्या अंगात सत्तेची मस्ती आली आहे. तुम्ही किती मुजोर आहात, हे दाखवून दिले आहे. त्या मुलीच्या डोळ्यातल्या त्या विद्यार्थिनीच्या, मराठा लेकराच्या डोळ्यातले पाणी माझ्या मनाला लागले आहे. सरकारच्या लाडक्या योजनांविषयी मी काय म्हणालो. मी ही योजना चांगली असल्याचे म्हटले आहे. पण आता या योजनेमुळे सरकारच्या संकेतस्थळावर कामाचा अतिरिक्त भार आला आहे. विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व्हर डाऊन झाल्याने त्याचा फटका बसला आहे. अनेक सरकारी कार्यालयात प्रमाणपत्र आणि इतर प्रशासकीय कामांसाठी लांबच लांब रांग लागली आहे. राज्यभर या अडचणी येत आहेत. त्याच्यात तुमचं लेकरू असतं तर किती वाईट झालं असतं किती वाईट वाटलं असतं किती त्रास तुम्हाला झाला असता मला मराठ्यांच्या पोरांना त्रास झालाय मला वेदना होत्यात म्हणून मी बोलतो, अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.
दरेकर यांच्यावर टीका
त्यांनी प्रवीण दरेकर यांच्या कालच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. आपण दरेकर यांच्यावर बोललोच नाही. तरीही ते आपल्यावर बोलतात, यामागे देवेंद्र फडणवीस असल्याचा आरोप त्यांनी केला. यापूर्वीचे मराठा समाजाचे आंदोलन दाबण्याचे आणि संपविण्याचे काम दरेकर यांनी केल्याचा गंभीर आरोपही जरांगे पाटील यांनी केला. समाजाने दरेकर यांना ओळखलं आहे. आता मुंबईत किती गर्दी घेऊन येतो, हे दरेकर पाहातीलच असा इशारा पण त्यांनी दिला. दरेकर यांनी बँकेमध्ये घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. आज दरेकर हे जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर होते.