महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचा विजय झाला. यावर मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर मनोज जरांगे पाटील फॅक्टर फेल झाल्याची चर्चा होत आहे. यावर मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे. अरे आम्ही मैदानातच नाहीत. तरी तुम्ही आम्हाला फेल झाला म्हणता. कोण निवडून आला काय आणि कोण पडला काय…, याचं आम्हाला काही सोयरं सुतकच नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणालेत. तुम्ही गोड बोलून मराठ्यांची मतं घेतली. पण ठीक आहे, उद्या आमचा आहे, असंही जरांगेंनी म्हटलं आहे.
एक महिन्याभर थांबा ,तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल. या निवडणुकीत मराठ्यांचे 204 आमदार झाले. मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणीही सत्तेत येऊ शकत नाहीत. आम्ही मैदानात असतो तर मराठ्यांनी एक शिक्का काम केलं असतं. पण आम्ही सांगितलं होत मराठा समाजाला जे करायचं ते करा. मी दोघांचेही अभिनंदन करतो निवडून येणाऱ्याचही आणि एक पडणाऱ्याचंही… मराठ्यांच्या फॅक्टरला बघूनच यांनी मराठ्यांना तिकीट दिले ना…, असं मनोज जरांगे म्हणालेत.
एखाद्या गोष्टीचं श्रेय कधी घ्यावं तर मोठ- मोठे कार्यक्रम घ्यावेत आणि मग म्हणावं. हा आमच्यामुळे आला आणि तो आमच्यामुळे आला… जेवढे लोक निवडून आलेत ना… त्यांच्या मागे मराठा फॅक्टर आहे. एखाख्या आमदाराने म्हणावं की तो मराठ्यांच्या जीवावर निवडून आला नाही. जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची सगळी हयात जाईल. तरी तुम्हाला कळणार नाही. तुम्ही मराठ्यांच्या कशाला नादी लागता. मराठाच मैदानात नाही आणि काही बांडगुळं बोलत बसतेत. जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणतेत. अरे पण आम्ही मैदानातच नाही, असं मनोज जरांगे म्हणालेत.
हे सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आलेलं आहे. आम्ही कुणाच्या जत्रेत जाऊन नळ्या सारखा खेळ नाही करत. लोकांच्या गर्दी नाही जायचं आणि माझंच आहे म्हणायचं. आमच्या फॅक्टरमुळंच सरकार आलं न् काय अन् काय बोलतेत. यांना दुसऱ्याचं पाळणं लोटायची सवय आहे, असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.