मराठा आरक्षणावरुन गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा फॅक्टर दिसून आला. भाजपसह महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. मराठा आरक्षणाचा पेच सुटण्याऐवजी तो वाढत आहे. ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. गावागावात यावरुन उभी दुफळी दिसून येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत सरकारला सळो की पळो करुन सोडले. पण आता त्यांनी पवित्रा बदलला आहे. सरकारसोबतच त्यांनी दुरुनच हा सर्व खेळ पाहणाऱ्या विरोधकांना जाब विचारला आहे.
29 ऑगस्टला विधानसभेचा निर्णय
लोकसभेच्या पराभवानंतर सर्वच राजकीय पक्ष अलर्ट झाले आहे. मराठा आणि ओबीसी वादात काहींनी ओबीसीसह मराठ्यांना पण जवळ करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. मराठा आरक्षणाचे भिजत घोंगडे हे काहींसाठी विधानसभेचा राजमार्ग ठरु शकते. त्यामुळेच हा मुद्दा जितका दिवस चिघळत राहिल, तितके राजकीय पक्षांसाठी सोयीस्कर राहिले, असे चित्र आहे. पण मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आता धीर संपत चालल्याचे अनेकदा जाहीर केले आहे.
29 ऑगस्टला सर्व मराठा समाज एकत्र येणार आणि त्यावेळी ठरवणार विधानसभा निवडणुक लढवायची की नाही, मला राजकारणात जायचं नाही, पण आता पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. आपला समाज यांना मोठा करायचं असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांसाठी लढणार असल्याचे ते म्हणाले.
भाजप निशाण्यावर
गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर निशाणा साधत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी अनेकदा तोंडसूख घेतले आहे. आता पण त्यांनी भाजपवर तिखट प्रतिक्रिया दिली. भाजपच्या लोकांचे डोके काम करत नाही, मला थांबवण्यासाठी प्रयत्न नाही. आम्ही त्यांना भाव देत नाही. शेवटी मराठापुढे शांत बसले नाही तर तुमचं राजकीय करीअर मराठा संपवून टाकेल, असा इशारा त्यांनी दिला.
विरोधकांना केले आवाहन
उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी की मराठे समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे की नाही. जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसेल तर सरकराने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा ,वाट पाहू नयेत, असे मत जरांगे पाटील यांनी मांडले. त्यांनी पहिल्यांदाच विरोधकांना थेट त्यांची भूमिका मांडण्याचे आवाहन केले आहे. सत्ताधारी अनेक दिवसांपासून विरोधकांवर याप्रकरणी आरोप करत आहेत. त्यांना कोडींत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. जरांगे पाटील यांच्या भूमिकेनंतर सत्ताधाऱ्यांना बळ मिळाले आहे.
जरांगे पाटील मूळ गावी
आज मूळ गावी मातुरी येथे यात्रेसाठी निघालो आहे. आमचं मूळ गाव आहे दर्शनासाठी जाणार आहे. आधी झालेला राडा आणि माझ्या दौऱ्याचा काही संबंध नाही. सरकारशी बोलणं झालं नाही, पाऊस सुरू आहे,ते त्यात व्यस्त आहेत.. त्यामुळे त्यांना आम्ही त्रास देत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.