मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एल्गार केला आहे. 4 जून रोजी उपोषणाला परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी आता आमरण उपोषण सुरु केले आहे. मराठा समाजाला ओबसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेसोयरेची अंमलबजावणी यासाठी त्यांनी आता आर या पारचा नारा दिला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारसह सरकारी यंत्रणेच्या पोटात गोळा आला आहे. आता थेट मोदींनाच साकडे घालण्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
सरकारने मुद्दाम नाकारली परवानगी
समाजाच्या न्याय मिळवण्यासाठी उपोषण सुरू झालंय, हे आमरण उपोषण आहे, सरकारने जाणूनबुजून परवानगी नाकारली असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. शिंदे-फडणवीस सरकारने सगे सोयरे अध्यादेश काढला आहे, त्याची अंमलबजावणी करावी या साठी हे उपोषण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परवानगी न देणे हे षडयंत्र आहे. आम्हाला राजकारण नको, आम्हाला आमच्या मागण्या द्या, लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, असे ते म्हणाले.
कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा इशारा
यावेळी मनोज जरांगे यांनी कायदा सुव्यवस्था बिघडण्याचा इशारा दिला. तसेच त्यासाठी कोण जबाबदार असतील हे पण सांगितले. पोलीस अधिकाऱ्यांना विनंती आहे ज्या लोकांनी निवेदन दिले ती लोक आमच्या लोकांना त्रास देताय, शिवीगाळ करताय, कायदा सुववस्था बिघडू देऊ नये. जर काही झालं तर जबाबदार निवेदन देणारे असतील, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठ्यांना शांत राहण्याचे आवाहन त्यांनी केले. काही जण जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याचे आवाहन त्यांनी केले.
पोलीस आले कशासाठी?
गावच्या लोकांनी निवेदन दिले, त्यामुळं दंगल होईल असे पोलिसांना भीती असेल म्हणून बंदोबस्त असेल एक तर दंगल रोखायला नाही तर आम्हाला धोपटायला पोलीस आले असतील असा चिमटा त्यांनी काढला.
मोदींना साकडे घालणार
उपोषण सुरू झालं आहे. उद्या मोदी साहेब शपथविधी घेणार आहेत मी पण निवेदन पाठवतो. चर्चेसाठी दरवाजे उघडे आहेत. आता सरकारला वेळ नाही लोकांना आवाहन त्यांनी इकडे येऊ नये शेती करावी. सरकारने प्रश्न सोडवावा. शिक्षण मोफत सुरू करावे, एसीबीसी मधून फॉर्म भरले आहेत त्यांना सहकार्य करावे, कुणबी प्रमाणपत्र मिळाले त्यांना त्याचा फायदा द्या.यावेळी गावागावात आंदोलन नको, कुठेही काहीही नसेल आंदोलन फक्त इथे होईल, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
सरकारला दिले आव्हान
माझ्या एका हाकेवर लाखो लोक येतील, सरकारला पाहायचं असेन तर पाहावे, असे आव्हान त्यांनी दिले. मला राजकारण नको, मात्र दिले नाहीतर मग नंतर बोल लावायचा नाही. माझ्या तब्येतीमुळे मी उपोषण करु नये, असे जनतेला वाटते. पण गेला तरी चालेल, पण न्याय मिळाला पाहिजे, असे भावनिक आवाहन त्यांनी केले.