राज्यात आरक्षणासाठी आणि आरक्षणाविरोधातील दोन्ही गट सक्रिय झाले आहेत. पंढरपूर, अंतरवाली सराटी आणि वडीगोद्री येथे आंदोलनाची धग सुरू आहे. आंदोलन पेटवण्यासाठी भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. सध्या पंढरपूर येथे धनगर समाजाचे आंदोलन सुरू आहे. त्याला बळ देण्याची गरज आहे. पण अंतरवाली आणि वडीगोद्री येथे भुजबळांची नाटक कंपनी आंदोलन करत असल्याचा चिमटा जरांगे पाटील यांनी काढला. दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी ते प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
ही भुजबळांची नाटक कंपनी
मराठा-ओबीसी वादावर मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी सातत्याने शांततेचे आवाहन करत आहे. या प्रकाराला मराठा-ओबीसी असे नावच देऊ नका. ओबीसी मराठ्यांच्या अंगावर कधीच येत नाहीत आणि मराठा सुद्धा ओबीसींच्या अंगावर कधीच जात नाहीत. ही भुजबळांनी लावलेली नाटक कंपनी आहे. ते आरक्षणासाठी आलेले नाहीत. ते ओबीसीच्या हितासाठी आलेले नाहीत. तर भांडण खेळण्यासाठी आलेले आहेत, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी ससाणे, हाके आणि वाघमारे यांच्यावर केला आहे.
तुम्ही किती थयथयाट केला असता
अंतरवाली सराटी, वडीगोद्री येथे सुरु असलेल्या ओबीसींच्या आंदोलनावर मनोज जरांगे पाटील यांनी सडकून टीका केली. त्यांचा लढा ओबीसींसाठी नाही तर भांडण उकरून काढण्यासाठी आहे. ते भुजबळांची नाटक कंपनी असल्याचा थेट आरोप त्यांनी या आंदोलनकर्त्यांवर केला आहे. ओबीसींचा खरा लढा पंढरपूर येथे सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. येथील आंदोलनामुळे मराठ्यांवर अन्याय होत असल्याचे, त्यांच्यावर वाळीत टाकण्याची, त्यांना एकटं पाडण्याची तयारी करण्यात येत असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला. हेच जर मराठ्यांनी केले असते तर त्यांचा किती थयथयाट झाला असता. पायात घुंगर घालून नाचले असते, असा टोला त्यांनी भुजबळांना लगावला.
हे आंदोलन फडणवीसांमुळेच
हे आंदोलन फडणवीस यांच्यासाठीच असल्याचा टोला जरांगे पाटील यांनी हाणला. मराठा समाजाला न्याय मिळाला नाही तर त्याचा दोष त्यांनाच असेल. येत्या तीन चार दिवसात यावर तोडगा निघेल, असा विश्वास पण जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. त्यांनी आज पुन्हा छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.