जालन्याचे माजी खासदार आणि भाजपमधील ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे हे आपल्या खास रांगडी भाषेसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडे किस्स्यांचे पोतडेच आहे. त्यातून एकहून एक इरसाल किस्से बाहेर पडतात. त्यांचं भाषण म्हणजे सभेत खसखस पिकली म्हणून समजा. लोकसभेत पराभव झाला तरी मोठ्या मनाने तो त्यांनी स्वीकारला. पण महाविकास आघाडीविषयी त्यांनी केलेले एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले आहे. ती गोष्ट जर आपण जाहीर केली तर महाविकास आघाडीची शक्कल उडतील. 3 पक्षांचे 6 होतील असा खळबळजनक दावा त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यावर टीका
भाजपाच्या वतीने महाराष्ट्राला दसऱ्याच्या शुभेच्छा त्यांनी दिल्या. दसरा मेळाव्या बोलावण्याची परंपरा बाळा साहेबांपासून सुरू झाली. मात्र तेव्हा बाळासाहेब जनतेला वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा द्यायचे असं ते बोलायचे. आताचे मेळावे केवळ नरेंद्र मोदी, भाजप, मुंबई तोडणार यावरच असतात, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना हाणला. जनता आता कन्फ्युज होणार नाही. नवीन पद्धती आता सुरू झाल्या आहेत, अशी टीका त्यांनी केली.
लोकसभेतील पराभवावर पण त्यांनी मत व्यक्त केले. हार जित होत असते. हा जनादेश आम्हाला मान्य आहे. आम्ही जनतेत जाऊ. आमची दहा वर्षातील कामगिरी उत्तम असल्याचा दावा त्यांनी केला. मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यावर त्यांनी मत व्यक्त केले. मेळाव्याचा काही संबंध नाही, असे ते म्हणाले.
त्यांच्या तोंडून कौतुकाचा एक शब्दही निघाला नाही
वडेट्टीवार, ठाकरे आणि पवारांच्या तोंडून आमच्या निर्णयाबद्दल गेल्या अडीच वर्षात काहीही चांगलं ऐकलं नाही. लाडकी बहीण विरोधात त्यांचे चेले चपाटे कोर्टात गेले. क्रिमिलेअर मर्यादा वाढवण्याचा निर्णय निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घेतलेला नाही असे त्यांनी सांगितले.
तर महाविकास आघाडीची शकलं
मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत वाद आहे. मुख्यमंत्री पदाचं नाव घोषित होताच मविआतील 3 पक्षांचे 6 पक्ष होतील, असा खळबळजनक दावा त्यांनी केला. शरद पवार कच्च्या गुरुचे चेले नाहीत. सकाळी संजय राऊत दुपारी जयंत पाटील आणि संध्याकाळी वडेट्टीवार असे तीन मुख्यमंत्री असतात, असा चिमटा त्यांनी महाविकास आघाडीला काढला. मुख्यमंत्री महायुतीचाच असेल असे ते म्हणाले.