अभिजित पोटे, प्रतिनिधी, जालना, ३ सप्टेंबर २०२३ : जालना जिल्ह्यात आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. लाठीमाराच्या विरोधात काही ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. राज्यातील राजकारण पेटलंय. आमदार रोहित पवार, उद्धव ठाकरे, संभाजीराजे यांनी अंतरगाव सराटी गावात जाऊन आंदोलकांची भेट घेतली. लाठीमारात ५० च्या वर जण जखमी झालेत. पण, हा लाठीमार का करण्यात आला. यासंदर्भात आता पोलीस महानिरीक्षकांनी खुलासा केलाय. पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले, मंगळवारपासून मनोज जवांगे यांनी उपोषण सुरू केले. त्यांची प्रकृती खालावत होती. तसा वैद्यकीय अधीक्षकांनी अहवाल दिला. त्यानुसार, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोणातून त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी ते तयारही झाले होते. पण, काही जनसमुदायाचा विरोध होता. त्यामुळे जनसमुदायाने महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर दगडफेक केली. एसआरपीचे जवान जखमी झाले. हिंसक जमावाला पांगवण्यासाठी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी बळाचा वापर करून जमाव पांगवला.
आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. अंबड येते पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. ४० आरोपींना अटक केली. एसआरपीच्या तीन कंपन्या मिळाल्या आहेत. बाजूच्या ठाण्यातून फोर्स उपलब्ध करून देण्यात आली आहे. पेट्रोलिंग सुरू करण्यात आली आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे.
नागरिकांनी कुठल्याही प्रक्षोभक भाषणाला बळी पडू नये. कायदा आपल्या हाती घेऊ नये. शांततेचं वातावरण करण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे. महिला पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. दोन पोलिसांना आयसीयूमध्ये भरती करावे लागले. सात जणांचे सीटीस्कॅन करावे लागले. हे वास्तव असल्याचं पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण म्हणाले.
जमाव आक्रमक झाल्यानंतर आम्ही जमावाला शांततेचं आवाहन केलं होतं. आंदोलकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे बळाचा वापर करावा लागला. हिंसक आरोपींना ताब्यात घेतले आहे. २१ महिला पोलीस आणि ४३ पुरुष पोलीस असे ६४ पोलीस कर्मचारी जालना सिव्हील रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती पोलीस महानिरीक्षकांनी दिली.