जालना : सत्यजित तांबे यांच्या प्रकरणापासून बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) यांच्यात वाद निर्माण झाला. बाळासाहेब थोरात यांनी सत्यजित तांबे यांची बाजू लावून धरली. महिनाभरानंतर त्यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्षांवर नाराजी व्यक्त केली. त्यासंदर्भात पत्र बाळासाहेब थोरात यांनी हायकमांडकडं पाठविल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आला. यावर प्रतिक्रिया देताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) म्हणाले, आम्हाला आताचं कळालं. आम्हीसुद्धा पुण्याहून कैलास गोरंटेवारच्या घरी जे लग्न आहे त्यासाठी आलो आहे. येथे आल्यानंतर ही बातमी कानावर आली.
बाळासाहेब थोरात यांचा विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा ही दुर्दैवी बाब आहे. बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे ज्येष्ठ आणि संयमी नेते आहेत. त्यामुळं यामागचं कारण हे समजल्याशिवाय प्रतिक्रिया देणं उचित नाही. बाळासाहेब हे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. शिवाय ते अतिशय संयमी आहेत. नेमकं काय घडलं याची माहिती घ्यावी लागले, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
अशोक चव्हाण म्हणाले, सकाळी आज मी बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यासाठी सकाळी दहाच्या सुमारास त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पण, त्यांनी विधिमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिल्याची माहिती नव्हती.
महाराष्ट्राचे प्रभारी हा वाद मिटविण्यासाठी महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. पक्ष मजबूत होण्यासाठी जे-जे करावं लागेल ते मी आणि विश्वजित कदम आम्ही दोघेही मिळून करू, असंही अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
यापूर्वी बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष होते. त्यांच्याकडून पदभार काढून नाना पटोले यांना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्षपद देण्यात आले. त्यानंतर काँग्रेसमधील एक गट नाराज झाला होता. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून पुन्हा नाराजी उफाळून आली.
सत्यजित तांबे यांना भाजपने पाठिंबा दिला. ते निवडूनही आले. पण, सत्यजित तांबे आणि बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त केली. आता हा वाद मिटविण्यात काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी कितीपत यशस्वी ठरतात, हे येत्या काही दिवसात दिसणार आहे. तोपर्यंत काँग्रेसमध्ये काय हालचाली घडतात हे पाहावं लागेल.