संजय सरोदे, जालना : जालना (Jalna) जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार सुरु असताना अपघात घडला. अपघातात मंदिराचा कळसच ढासळला. दगड विटांचा भाग थेट अंगावर कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झालाय. जेसीबीच्या मदतीने कळस पाडण्याचे काम सुरु होते. मात्र अचानक कळसाचा तोल बिघडला आणि तो थेट जेसीबीवर येऊन आदळला. त्यामुळे जेसीबी चालक गंभीर जखमी झाला आणि यातच त्याचा मृत्यू झाला..
जालना जिल्ह्यातील मानेगाव येथे ही घटना घडली. गावातील जुन्या मारुती मंदिराचा जीर्णोद्धाराचं काम नुकतच हाती घेण्यात आलंय. आज जेसीबीच्या मदतीने मंदिराचा कळस पाडण्यात येत होता. मात्र कळसावर घाव घालण्यात आल्याने त्याचा ढासा अचानक कोसळला. हा ढाचा नेमका कोणत्या दिशेने कोसळेल याचा अंदाज चालकाला आला नाही. कळस कोसळत असल्याचं त्याला दिसलं मात्र जागेवरून हलण्याच्या आतच संपूर्ण मलबा त्याच्या अंगावर येऊन पडला.
या भीषण घटनेत जेसीबी चालकाला गंभीर इजा झाली. मात्र रुग्णालयात नेईपर्यंत त्याचा मृत्यू झाला. गावातील पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार सुरू असल्याने गावातील अनेक मंडळी तेथे जमा झाली होती. मात्र अचानक घडलेल्या घटनेत कुणालाही मदत करता आली नाही. या दुर्दैवी घटनेत प्रकाश जाधव नावाच्या जेसीबी चालकाचा जागीच मृत्यू झाला.
गावातील पुरातन मंदिरं म्हणजे भाबड्या गावकऱ्यांच्या श्रद्धेचं ठिकाण असतं.अनेक दिवसांपासून जीर्ण झालेल्या मारुती मंदिराला नवं रुप द्यावं, या हेतूने गावकऱ्यांनी जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं होतं. मात्र आज घडलेल्या घटनेने गावकऱ्यांमधून हळहळ व्यक्त होत आहे. मंदिराचा कळस जेसीबी चालकावर कोसळल्यानंतर गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत, चालकाला बाजूला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत गंभीर जखम झाल्याने त्याचे प्राण गेले.