मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मागच्या पाच दिवसांपासून जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणस्थळाकडे जाण्यासाठी काही मराठा आंदोलक निघाले. पण वडीगोद्री या गावात त्यांना अडवण्यात आलं. अंतरवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आलं होतं. यावेळी मराठा समन्वयक आणि ओबीसी आंदोलक आमनेसामने आले. तेव्हा दोन्ही बाजूच्या आंदोलकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ही बाब मनोज जरांगेंना कळताच त्यांनी सरकारमधील मंत्र्यांना फोन करत इशारा दिला. त्यानंतर अंतरवलीच्या रस्त्यावर करण्यात आलेलं बॅरिकेटिंग हटवण्यात आलं.
जालन्यातील अंतरवलीकडे जाणाऱ्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी वडीगोद्रीत अडवलं. बॅरिकेटिंग करत रस्ता पोलिसांनी बंद केला. त्यामुळे मराठा समन्वयक आक्रमक झाले. वडीगोद्रीत रात्री लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी मराठा आणि ओबीसी कार्यकर्ते आमने सामने आले. मराठा आणि ओबीसी आंदोलकांकडून रात्री घोषणाबाजी करण्यात आली. अंतरवलीकजे येणाऱ्या आंदोलकांना अडवल्याने मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले. 15 मिनिटात बॅरिकेटिंग काढा अन्यथा तेचं बॅरिकेटिंग सागर बंगल्यापर्यंत फेकतो, असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. रात्री मनोज जरांगेंनी मंत्री दीपक केसरकर आणि शंभुराज देसाई यांना फोन केला. जरांगेंच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी वडीगोद्रीतील बॅरिकेटिंग हटवलं.
वडीगोद्रीतील बॅरिकेटिंग करण्यात आल्याने मनोज जरांगे आक्रमक झाले. वडीगोद्रीतील बॅरिकेटिंग काढले नाही तर मी तिथं येतो. 15 मिनिटांमध्ये बॅरिकेटिंग काढा. नाही तर तिथं येऊन सागर बंगल्यापर्यंत तेचं बॅरिकेटिंग फेकतो. तुमच्या बापाचा रस्ता आहे का अडवायला? 15 मिनिटांमध्ये गेट काढा नाही तर मी बॅरिकेटिंग काढायला येतो. देवेंद्र फडणवीसाला दंगली घडवायच्या आहेत का? उपोषणापुढे उपोषण करायला परवानगी का देता? मुख्यमंत्र्यांना फोन लावा त्याची चौकशी लावा…, असा इशारा मनोज जरांगेंनी पोलिसांना दिला.
मनोज जारंगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज बीड बंदची हाक देण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांचे मागील पाच दिवसापासून उपोषण सुरू आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली. आजचा बंद शांततेत पार पडेल असं आश्वासन जरांगे समर्थकांनी दिलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज बीड शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. बीड जिल्हा हे मनोज जरांगे पाटलांचं जन्म गाव असल्यानं बीडमधून पहिला बंद पुकारण्यात आला आहे.