टॅक्सी-ऑटो रिक्षा भाड्याचा टप्पा एक किलोमीटर करावा, भाडे वाढ करु नये, जनता दलाची मागणी

| Updated on: Jan 15, 2025 | 5:54 PM

आतापर्यंत भाडेवाड करताना सरकारकडून नेहमीच प्रवाशांच्या हिताकडे दुर्लक्ष केले गेले आहे. मग तो वेटिंग चार्जेस लावण्याचा मुद्दा असो की रात्री जादा दराने भाडे आकारण्यास परवानगी देण्याचा प्रश्न असो. शासकीय यंत्रणांनी कायमच चालक मालकांना झुकते माप दिले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या हिताचाही विचार व्हावा, असे जनता दलाचे म्हणणे आहे.

  टॅक्सी-ऑटो रिक्षा भाड्याचा टप्पा एक किलोमीटर करावा, भाडे वाढ करु नये,  जनता दलाची मागणी
Follow us on

सर्वसामान्य जनता आधीच महागाईने त्रस्त आहे. त्यामुळे कर्जाच्या विळख्यात अडकू लागली आहे. या पार्श्वभूमीवर टॅक्सी आणि ऑटो रिक्षा भाड्यात वाढ करण्याची संघटनांची मागणी मान्य करू नये तसेच प्रवाशांचे हित विचारात घेऊन भाड्याचा पहिला टप्पा दीड किलोमीटरच्या ऐवजी एक किलोमीटरने सुरू करावा, अशी मागणी जनता दल सेक्युलर मुंबई पक्षाने केली आहे. टॅक्सी रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी चालक-मालकांच्या संघटनानी परिवहन विभागाकडे केली आहे. अलीकडच्या काळात विशेषतः सीएनजीच्या दरात फार मोठी वाढ झालेली नाही. दुसरीकडे सामान्य माणूस महागाईमुळे मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे भाडेवाढीची मागणी सरकारने मान्य करू नये, असे पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

कमी अंतराचा प्रवास करणाऱ्यांवर अन्याय

प्रवासी, विशेषत: महिला एक किलोमीटर वा त्याहीपेक्षा कमी अंतरासाठी अनेकवेळा टॅक्सी रिक्षाचा वापर करतात. मुलांना शाळेत सोडण्यासाठी जाताना, डॉक्टरकडे जाताना बहुतेक एक किलोमीटर पेक्षा कमी प्रवास केला जातो. मात्र एवढ्या प्रवासासाठीही दीड किलोमीटरचे म्हणजेच रिक्षाला २३ रुपये तर टॅक्सीसाठी २८ रुपये मोजावे लागतात.  पहिला टप्पा एक किलोमीटरचा केल्यास कमी अंतरासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फायदा होऊ शकेल. असा टप्पा केल्यास साधारण १५ रुपयात रिक्षाने तर तर २० रुपयात टॅक्सीने प्रवास करता येईल. तसेच यामुळे वापर वाढून, चालक -मालकांचा व्यवसायही वाढू शकेल. त्यामुळे एक किलोमीटरचा टप्पा करण्याच्या मागणीचा विचार व्हावा, असे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांना लिहिलेल्या पत्रात जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर  यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

डबल भाडे  वसुल केले जात आहे

सध्या वाटेत वाहन 30 सेकंदापेक्षा अधिक काळ थांबल्यास त्या काळात ‘वेटिंग चार्ज’ चालकाला मिळतो. ही तरतूद करतानाही प्रवाशांच्या हिताकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. उदाहरणार्थ प्रवासी १.२ किलोमीटर अंतर गेल्यास पहिल्या टप्प्याच्या २३ रुपयातील काही रक्कम शिल्लक असते, ज्यात तो आणखी तीनशे मीटर प्रवास करू शकणार असतो. परंतु  १.२ किलोमीटर प्रवास करताना मध्ये वाहन खोळंबल्यास वेटिंग चार्जेस लागून भाडे २५-२६ रुपये होते. वास्तवात अशा वेळेस शिल्लक रकमेचा वापर वेटिंग चार्जेस म्हणून व्हायला हवा. म्हणजे एकप्रकारे डबल भाडे प्रवाशांकडून वसूल केले जाते. त्यामुळे वेटिंग चार्जेस दीड वा एक किलोमीटरच्या अंतरानंतर लागू करण्यात यावेत, अशी मागणीही जनता दलाच्या वतीने या सर्वांनी केली आहे.