देवेंद्र फडणवीस हे उद्या तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. मुंबईच्या आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह इतर केंद्रीय मंत्री उपस्थित राहणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला तब्बल 22 राज्यातील मुख्यमंत्री देखील हजर राहणार आहेत. दरम्यान या शपथविधी सोहळ्यापूर्वी अंतरवाली सराटीमधून मोठी बातमी समोर येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या आहेत, सोबतच इशारा देखील दिला आहे.
नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
शुभेच्छा द्यायला ते काही आमचे शत्रू नाहीत, त्यामुळे त्यांचे अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देखील देतो. महाराष्ट्रात आमची संस्कृती आहे. आम्ही विरोध पण करतो आणि मोठ्या मनाने शुभेच्छा देखील देतो, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. सोबतच मराठा समाजाला आरक्षण मिळल्याशिवाय सुट्टी नाही, असा इशारा देखील यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आपल्या आंदोलनाबाबत मोठी घोषणा केली आहे.
काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील हे तुळजापूर दौऱ्यावर असताना त्यांनी आता आपण मराठा आरक्षणासाठी सामूहिक आमरण उपोषण सुरू करणार असल्याचं म्हटलं होतं. हे आंदोलन मुंबईच्या आझाद मैदानात होईल किंवा अंतरवालीमध्ये होईल असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यांनी आता या संदर्भातील आपली दिशा स्पष्ट केली आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर आपण सामूहिक आमरण उपोषण करणार असून, मरेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील हीच आंदोलनाची पुढची दिशा असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
आंतरवाली सराटीमध्येच सामूहिक आमरण उपोषण होणार आणि ते खूप भव्य दिव्य होणार. असं आंदोलन कोणीही बघितलं नसेल असं ते सामूहिक आमरण उपोषण होईल. मात्र आरक्षण घेतल्याशिवाय मी कोणालाही सोडणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.