शंकर देवकुळे, टीव्ही 9 मराठी, सांगली : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्याबाबत मोठा दावा केला होता. यामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार हे भाजपचे आहे असं म्हणत अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देखील दिला होता. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खुलासा करत असतांना राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी शरद पवार यांची खेळी असल्याचे म्हंटले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांची मोठी अडचण झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामध्ये अजित पवार यांच्या भूमिकेवरही यानिमित्ताने शंका घेतली जात आहे. त्यामुळे जयंत पाटील यांनी दुसऱ्यांदा प्रतिक्रिया देत खुलासा केला आहे. विशेष म्हणजे यावर सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया देणं टाळलं होतं. त्यामुळे जयंत पाटील यांनी घुमजाव तर केला नाही ना? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.
प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते? :-
एका मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटलं होतं, माझे पूर्वीपासूनचे मत आहे, शरद पवार हे भाजपचे आहेत. अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीनंतर दिलेल्या मुलाखतीत म्हंटलं होतं की माझं काय चुकलं ही पक्षाची भूमिका होती, त्यात मी पहिला आलो आहे. माझ्यासाठी हे अजिबात धक्कादायक नाही. महाविकास आघाडीसोबत आमची युती नाही. युती ठाकरे गटासोबत आहे.
जयंत पाटील यांची आंबेडकर यांच्या विधानावर पहिली प्रतिक्रिया :-
पहाटे घेतलेल्या शपथविधीची खेळी जाणीवपूर्वक कोणी केली असं म्हणता येणार नाही, मात्र त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट उठण्यास मदत झाली. तसेच या घटनेनंतर उलट राष्ट्रवादी भक्कम झाली.
जयंत पाटील यांची दुसरी प्रतिक्रिया :-
शरद पवार यांची खेळी हे असं बोललो नाही. ते गेस केलं होतं. जो घटनाक्रम बघितला होता आणि त्या घटनाक्रमाचा फायदा हे राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी होता. त्यामुळे पवार साहेबांनी ते जाणून बुजून केलं असं म्हणता येत नाही.