मुंबई: राज्य सरकार सतत म्हणते की राज्याचे पैसे केंद्र सरकारकडे आहे. जीएसटीचा (gst) पैसा केंद्राकडे आहे. मी म्हणतो, राज्यातील मंत्र्यांनी केंद्रासोबत बसावे आणि तुमचे किती पैसे केंद्राकडे आहे आणि केंद्राचे किती पैसे राज्याकडे आहे याचा हिशोब लावावा, असं केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलं होतं. त्याला राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (jayant patil) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्याचे बरेच पैसे केंद्राकडे आहेत. राज्याकडे केंद्राचे जे पैसे आहेत ते विकास प्रकल्पाचे आहेत. काही कारणामुळे प्रकल्प उशीर होत असल्यामुळे पैसे राज्याकडे आहेत, असं सांगतानाच हिशोबच जर मांडायचा असेल तर मुख्यमंत्र उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडतील. रावसाहेब दानवेंकडे (raosaheb danve) का मांडतील? असा सवालच जयंत पाटील यांनी केला आहे. जयंत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. त्यामुळे पाटील आणि दानवे यांच्यातील हा कलगीतुरा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादीचा परिवर संवाद यात्रा आज सुरू होत आहे. जयंत पाटील आज कोकणात रायगड येथे जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत. येत्या 23 तारखेला कोल्हापूरला शरद पवारांच्या उपस्थितीत या यात्रेचा समारोप होणार आहे. त्यानिमित्ताने पाटील मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी भाजप आणि मनसेवरही टीका केली. भाजपा – मनसे एकच आहेत. भाजपला मनसेला जवळ करायचे आहे. पण उत्तर भारतीय मते हातातून जातील म्हणून भाजपचे नेते संभ्रमात असावे असं सांगितलं जात आहे. मात्र, राज ठाकरे यांची सभा झाल्यावरच त्यावर अधिक बोलू, असं जयंत पाटील म्हणाले.
शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकवरील आंदोलनावरही त्यांनी भाष्य केलं. तपास नेमका कुठपर्यंत आला माहीत नाही. आंदोलनाला खतपाणी घालणारे कोण आहेत? या आंदोलनामागे नेमकं कोण आहे? याबाबतचा पोलीस तपास करत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे सुद्धा या तपासावर लक्ष ठेवून आहेत, असं त्यांनी सांगितलं. पवार यांच्या घरावर भ्याड हल्ला झाला. त्यांनी लोकांना बोलावले. डिवचले तरी काही उपयोग होणार नाही. आता एसटी कर्मचाऱ्यांना त्यांची चूक समजून आली आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, किरीट सोमय्या फरार झाले आहेत. त्याबाबत त्यांना विचारण्यात आलं असता संजय राऊत नेमकं काय म्हणाले मला माहीत नाही, असंही त्यांनी सांगितलं.
रावसाहेब दानवे यांनी काल टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी केंद्राकडील पैशावरून राज्य सरकारवर टीका केली होती. राज्य सरकार सतत म्हणते की, जीएसटीचा पैसा केंद्राकडे पडून आहे. मला वाटतं राज्यातील नेते, मंत्र्यांनी केंद्रासोबत बसून चर्चा करावी. राज्याकडे किती पैसे आहेत आणि केंद्राकडे किती पैसे आहेत याचा हिशोब लावावा. तसेच कधीपर्यंत पैसे देणार याचा राज्याने कालबद्ध कार्यक्रम सांगावा. केंद्राने सुद्धा कधीपर्यंत पैसे देणार हे स्पष्ट केलं पाहिजे. दोन्ही सरकारांनी कालबद्ध कार्यक्रम ठरवला पाहिजे, असं दानवे म्हणाले होते. राज्याकडे एसटीचे 5000 कोटी बाकी आहेत. एमआरव्हीसीचे 700 कोटी बाकी आहेत. धारावीचे 200 कोटी राज्याकडे पडून आहेत. बुलेट ट्रेन साठी एक लाल तांबडा पैसा सुद्धा दिलेला नाही. माझं म्हणणं आहे. राज्याने आणि केंद्र सरकारने हिशोबाला बसावं, असं आव्हानच दानवे यांनी दिलं आहे.
संबंधित बातम्या:
Sanjay Raut: कुठे आहेत दोन ठग?, सोमय्या देशाबाहेर पळून जाऊ शकतात; राऊतांना शंका