मुंबई : राज्याचं राजकारण सध्या चांगलच सरप्राईज मोडवर आहे. गेल्या काही दिवसात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं बंड होण हे सरप्राईजिंग वाटत होतं. मात्र त्यांच्याच नावाची घोषणा ही मुख्यमंत्रिपदासाठी होणं हेही अनेकांसाठी सरप्राईज ठरलं आहे. तयारी केली फडणवीसांची (Devendra Fadnavis) पेपर आला एकनाथ शिंदे यांचा अशी अवस्थाही सध्या अनेकांची झाली आहे. अनेक राजकीय पंडितांच्या अंदाजही हुकली आहे. यावर आता राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया आली (Maharashtra Government Cabinet) आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होणं राजकारणात काहीही होऊ शकतं हे दाखवणारं आहे. तसेच ते मुख्यमंत्री होणं सुखावह धक्का अशी प्रतिक्रिया देत जितेंद आव्हाड यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं आहे. गेली अनेक वर्षे एकनाथ शिंदे यांचा प्रवास बघणारा कार्यकर्ता म्हणून मी पाहिला आहे, असे आव्हाड म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री हा आपल्या शहराचा विकास करतो. त्यामुळे आता ठाण्याचा आणखी चांगला विकास होईल. आम्ही अनेक वर्षांपासान राजकारणात आहे. आजही आमचा समोरासमोर वाद झाला नाही. काही ठिकाणी वाद झाले मात्र ते टोकाचे नव्हते. आम्ही कधीच एकमेकांच्या तंगड्यात तंगडं घालण्याचं काम कधी केलं नाही, असेही आव्हाड म्हणाले आहेत. संघर्ष होत असतो. एक ठाणेकर म्हणून, त्यांच्यासोबत कार्यकर्ता म्हणून काम केल्याने मी त्यांचं स्वागतच करेन. माझ्या मतदारसंघासाठी मला कुणाच्या दारात जायला कमीपणा वाटणार नाही. मला ते मदत करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्री झाल्यावर सर्वांना समान वागणूक द्यावी लागते. त्यामुळे तेही तशी वागणूक देतील हा मला विश्वास आहे. आजपर्यंत घरी जाताना कुणाच्या कधी विचारावं लागलं नाही. मात्र आता कदाचित परिस्थिती बदलेल. मात्र तरीही जितेंद्र आव्हाड त्यांच्या घरी जाईल आणि माझ्या मतदारसंघासाठी जे हवं ते मागेल, असेही आव्हाड म्हणाले आहेत.
तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही शिंदेंचं स्वागत केलं आहे. स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे, असे ट्विट हे शरद पवार यांच्याकडून करण्यात आलं आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण, श्री. बाबासाहेब भोसले, श्री. पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 30, 2022