राजकीय हालचालींचं केंद्र मुंबईत?, मोठ्या घडामोडींना वेग, भाजप नेत्यांची फडणवीस यांच्या बंगल्यावर बैठक सुरू

| Updated on: Sep 14, 2024 | 3:03 PM

भाजपचे राष्ट्रीय नेते जेपी नड्डा मुंबईत आहेत. त्यांनी आज मुंबईतील गणेशाचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पक्षाची बैठक सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्व राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे.

राजकीय हालचालींचं केंद्र मुंबईत?, मोठ्या घडामोडींना वेग, भाजप नेत्यांची फडणवीस यांच्या बंगल्यावर बैठक सुरू
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

विधानसभा निवडणुकीला अवघे काहीच महिने उरले आहेत. कधीही या निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख आघाड्यांचे नेते कामाला लागले आहेत. जागा वाटप हाच या दोन्ही आघाड्यांमधील महत्त्वाचा तिढा आहे. तो सोडवण्यासाठी दोन्ही आघाड्यांमध्ये जोरबैठका होत आहेत. तसेच पक्षीय स्तरावरही स्वतंत्र बैठका घेऊन जागा वाटपाची रणनीती ठरवली जात आहे. तसेच इतर राजकीय रणनीतीही ठरवली जात आहे. भाजपमध्येही सध्या जोरबैठका वाढल्या आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे आज मुंबईत आले आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालीच भाजपची एक महत्त्वाची बैठक सुरू आहे. या बैठकीत जागा वाटपावर चर्चा करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

भाजपचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर ही बैठक सुरू आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, रावसाहेब दानवे, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, आशिष शेलार, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश आणि खासदार पीयूष गोयलही या बैठकीला उपस्थित आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

जागांवर चर्चा?

महायुतीच्या जागा वाटपाबाबतच्या चर्चा झाल्या होत्या. त्यावेळी शिंदे आणि अजितदादा गटांनी किती जागा लढवायच्या याबाबतची माहिती भाजपला दिली होती, असं सांगितलं जातं. त्यावरच आजच्या बैठकीत चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच महायुतीतील शिंदे आणि अजितदादा गटाला किती जागा द्यायच्या, इतर छोट्या पक्षांना किती जागा द्यायच्या आणि भाजपने किती जागा लढवायच्या याची चर्चाही या बैठकीत सुरू असल्याचं सांगण्यात आलं. त्याशिवाय कोणत्या जागांचा अधिक तिढा आहे तसेच कोणत्या जागांची अदलाबदली करायची आहे, यावरही चर्चा केली जाणार आहे. तसेच मुंबई, पुणे आणि नागपूरमधील काही महत्त्वांच्या जागांबाबतही यावेळी चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

आयाराम गयारामांवरही चर्चा

विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच आयाराम गयारामांची चलती सुरू होणार आहे. त्यामुळे कुणाला प्रवेश द्यायचा आणि कुणाला नाही, यावरही या बैठकीत चर्चा होऊ शकते असं सांगितलं जात आहे. मात्र, त्याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

लाडकी बहीण ते…

राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. पण या योजनेचं श्रेय घेण्यासाठी महायुतीत चढाओढ सुरू आहे. या श्रेयवादाच्या लढाईत भाजप मागे पडताना दिसत आहे. त्यामुळे या बैठकीत त्यावरही चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी महायुतीतील घटकपक्षांच्या श्रेयवादावर बैठकीत नाराजी व्यक्त केली जाण्याची शक्यता आहे. या योजनेमुळे महायुतीला किती फायदा होऊ शकतो? किती टक्के महिला मतदार महायुतीकडे येऊ शकतात याच्यावरही चर्चा केली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. या शिवाय राज्य सरकारच्या इतर योजनांचीही चांगली कँपेनिंग करण्यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई प्रमुख केंद्र?

राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आधी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. आता दिल्लीतील सर्वच पक्षाचे नेते मुंबईत येऊन चर्चा करताना दिसत आहेत. मुंबईतच जागा जोरबैठकांना उधाण आलं आहे. जागा वाटप केलं जात आहे. त्यामुळे मुंबई हे राजकीय हालचालींचं केंद्र बनलंय का? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.