कोल्हापूरः देशात यंदा सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (75 years since independence) साजरा होत आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे होत असतानाच देशाने अनेक क्षेत्रात गगनभरारी घेतली आहे. 1947 भारत स्वातंत्र्य झाला आणि 1948 मध्ये बाँबे स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (बीएसआरटीसी) कडून प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात आली. या कंपनीलाच त्या काळात सार्वजनिक वाहतुकीचा अधिकार देण्यात आला, आणि 1 जून 1948 रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर राज्यातील पहिली बस धावली. त्यानंतर महाराष्ट्राची राज्याची स्थापना झाली आणि महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (Maharashtra State Road Transport Corporation) सुरळीत कारभार राज्यात सुरू झाला. 1948 पासून ते अगदी आतापर्यंत एसटी महामंडळाने दिवसेंदिवस प्रगत करत 7 दिवस आणि 24 तास कार्यरत राहून प्रगतीच्या बाबतीत प्रचंड मोठी भरारी घेतली.
गाव तेथे एसटी आणि रस्ता तेथे एसटी असं ब्रीद घेऊन महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यापासून ते गावं वस्त्यापर्यंत एसटी पोहचली, मात्र एसटीच्या या प्रवासात आणि स्वातंत्र्य महोत्सवासाच्या भारतातील आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील काजिर्णे (Kajirne) गावात मात्र कधीही बस आली नाही.
कोल्हापूर जिल्ह्यातील आणि चंदगड तालुक्यातील काजिर्णे हे गाव हजार आणि दीड हजार वस्तीचं गाव. काजिर्णे आणि म्हाळुंगे अशी ग्रुप ग्रामपंचायत या गावाला आहे. चौथी पर्यंत शाळा आहे. चौथीनंतर मात्र आता हिंडगाव, चंदगड आणि नागनवाडीला येथील मुलं शाळेला जातात. एसटीची सेवा गाव तेथे एसटी आणि रस्ता तेथे एसटी अशी असली तरी काजिर्णे गावाला मात्र एसटी महामंडळाकडून ही सेवा देण्यात आली नाही. या गावाला जाण्यासाठी बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर धावणाऱ्या बस काजिर्णे गावाच्या फाट्यावरुन जातात, फाट्यावरुन गावामध्ये चालतच जावे लागते.
बेळगाव-सावंतवाडी या राज्य महामार्गापासून काजिर्णे गाव चार ते पाच किलो मीटर आता आहे. गावातून बाहेर जाण्यासाठी किंवा मुलांना शाळेला जाताना नेहमी बससाठी चार ते पाच किलो मीटर चालत हिंडगाव फाट्यावर येऊनच बस पकडावी लागते. शाळेला जाणाऱ्या आणि शाळेतून येणाऱ्या मुलांसाठी सायंकाळ झाल्यावरही याच रस्त्याने चालत घरी परतावे लागते. काजिर्णे गावाजवळ डोंगर असल्याने या परिसरात नेहमीच गव्या रेडा, डुक्कर आणि सुगीच्या दिवसात हत्तींचाही वावर असतो. या परिस्थितीही येथील नागरिकांनी नेहमीच बससाठी चार ते पाच किलोमीटर चालत येऊन हिंडगाव फाट्यावर बस पकडावी लागत आहे.
काजिर्णे गावात गेल्या कित्येक वर्षांपासून बस सुरु का करण्यात आली नाही याबाबत माहिती देताना अधिकारीवर्गानी सांगितले की, त्यासाठी ग्रामपंचायतीकडून मागणी, त्याप्रकारचा ठराव येणेही गरजेचे असते मात्र त्याप्रकारचा ठराव काजिर्णे-म्हाळुंगे ग्रुप ग्रामपंचायतीकडून कधी आलाच नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने एवढ्या वर्षात एकदाही काजिर्णे गावामध्ये बस सुरू व्हावी म्हणून ठराव कधी दिला नाही. त्यामुळेच गेल्या 75 वर्षामध्ये अजून एकदाही गावात बस आली नाही.
काजिर्णे गावामध्ये ज्याप्रमाणे कधीच बस आली नाही त्याच प्रमाणे अजूनही गावामध्ये स्मशानभूमीची सोय ग्रामपंचायतीकडून करण्यात आली नाही. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून गावात एखादं मयत झाले तर ग्रामस्थ आजही आपापल्या जागेत मृतदेहावर अंत्यसंस्कार करतात.