कल्याण | 21 डिसेंबर 2023 : चोरी, लूटमार, घरफोडी, दरोडे, अशा गुन्ह्यांच्या अनेक घटना सध्या वाढल्यामुळे नागरिक बरेच धास्तावलेले असतात. पण या युगातही लोकांचा प्रामाणिकपणा टिकून आहे. त्याचेच एक उत्तम उदाहरण दर्शवणारी घटना नुकतीच कल्याणमध्ये घडली. एका रिक्षाचालकाने महिला प्रवाशाची दागिन्याने भरलेली बॅग परत केल्याने केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्या बॅगमध्ये तब्बल सात तोळ्यांचे दागिने होते. एवढे दागिने रिक्षात विसरल्यामुळे त्या महिलेच्या चेहऱ्यावर चिंतेचं जाळं पसरलं होतं मात्र रिक्षाचालकाने प्रामाणिकपणे दागिन्यांची बॅग परत केल्याने तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू फुललं. मोहन राठोड असे या रिक्षा चालकाचे नाव असून सध्या त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
नातेवाईकांना भेटायला आली होती महिला
ठाण्यात राहणाऱ्या नम्रता देशमुख ही महिला कल्याणला एका नातेवाईकांकडे आली होती. त्यासाठी तिने कल्याण स्टेशनवर उतरून पश्चिमेकडील चिकनघर परिसरात जात होती. हातात बरंच सामान असल्याने रिक्षात बसल्यावर तिने दागिन्यांची बॅग रिक्षात मागच्या बाजूला ठेवली. खाली उतरल्यावर तिने सर्व सामान घेतले मात्र दागिन्यांची बॅग मागेच विसरली. रिक्षाचालक राठोड तसेच पुढे निघून गेले. मात्र थोड्या वेळाने रिक्षात मागे बॅग असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कल्याण स्टेशन पसिररात पुन्हा येऊन त्या महिलेचा शोध घेतला, तसेच त्यांना ज्या ठिकाणी सोडले तिथेही जाऊन शोधले मात्र ती महिला कुठेच सापडली नाही.
दरम्यान त्या प्रवासी महिलेने महात्मा फुले पोलिस स्टेशन गाठत तेथे बॅग हरवल्याची तक्रार नोंदवली होती. ही माहिती मिळताच महात्मा फुले पोलिसांनी लगेचच परिसरातील सीसीटीव्ही तपासत त्या रिक्षाचा नंबर शोधून काढत रिक्षाचालक राठोड याच्याशी संपर्क साधला. तेव्हा राठोड हे स्वतः त्या महिलेला बॅग देण्यासाठी शोधत असल्याचे पोलिसांना समजले. मात्र ती महिला न सापडल्याने त्यांनी ती बॅग रिक्षा युनिअनच्या कार्यालयात ठेवली होती. पोलिसांनी पोन केल्यानंतर राठोड यांनी ती बॅग घेतली आणि ते महात्मा फुले पोलिस स्टेशनला पोहोचले. आणि दागिन्यांनी भरलेली बॅग त्या महिलेच्या हातात ठेवली, ते पाहून इतका वेळ चिंतातुर असलेल्या त्या महिलेने सुटकेचा नि:श्वास सोडला आणि तिच्या चेहऱ्यावर हसू फुलले. पोलिसांनीही त्या रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत त्याचा सत्कार केला. त्या महिलेनेही रिक्षा चालक आणि पोलिसांते आभार मानले.