हिजाब (Hijab) धर्माचा अविभाज्य भाग नाही. हिजाब घालणे इस्लाममध्ये बंधनकारक नाही. त्यामुळे शाळेत हिजाब परिधान करायचा की नाही, हा सर्वस्वी शाळा (school) प्रशासनाचा अधिकार आहे. त्यावर तेच निर्णय घेतील, असा ऐतिहासिक निर्णय कर्नाटक हायकोर्टाने (Karnataka High Court) आज सोमवारी 15 मार्च रोजी दिला. सोबतच या संदर्भातील सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. या निर्णयाचे ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना स्वागत केले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नाही. त्यामुळे स्वैराचार बोकाळेल. माझ्या मते या निकालाचे चांगले निश्चित परिणाम दिसतील. कुठल्याही राजकीय पक्षाने कोण जिंकले, कोण हरले हे न पाहता, याचे भांडवल न करू नये. भारतीय लोकशाही कशा रितीने बलवान होईल याकडे कटाक्ष द्यावा, असे आवाहनही निकम यांनी यावेळी केले.
अमर्याद स्वातंत्र्यामुळे स्वैराचार…
ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हणाले की, भारतीय घटनेनुसार भारतीय नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो हक्क मिळाला आहे, त्याचा बऱ्याच वेळा काही लोक गैरअर्थ काढण्याचा प्रयत्न करतात. त्यांना निश्चित या निकालामुळे समजेल की, अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्हाला अमर्याद स्वातंत्र्य आहे. कारण अमर्याद स्वातंत्र्यामुळे स्वैराचार निर्माण होऊ शकतो. ही बाब देखील या निकालातून स्पष्ट करण्यात आली आहे.
तर भविष्यात लोकशाहीला धोका…
उज्ज्व निकम म्हणाले की, दुसरी महत्त्वाचा बाब म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अनेक राष्ट्रांच्या घटनांचा अभ्यास केला आहे. कारण या देशात अनेक जाती, धर्माचे लोक एकत्र राहतात. आणि प्रत्येक जण आपल्या राहण्यामध्ये, वागण्यामध्ये धार्मिक गोष्टींचा पगडा मनात ठेवून वागायला लागला, तर लोकशाहीला भविष्यात धोका निर्माण होऊ शकतो. हे जाणूनच आपल्या घटनेचा वरचष्मा कायम ठेवला आहे.
नियमांच्या चौकटीत वागावे…
उज्ज्वल निकम म्हणाले की, शाळा असेल किंवा कॉलेज असेल इथे धार्मिक प्रवृत्ती वाढू द्यायच्यात का, हा एक महत्त्वाचा प्रश्न यातून निर्माण होत होता. प्रत्येकाला आपल्या धर्मानुसार आचरण करण्याचा हक्क आहे, पण ज्यावेळा शिक्षण किंवा काही उद्योग करतो असतो, त्यावेळेला नियमांच्या चौकटीत वागले पाहिजे. हा देखील एक भारतीय घटनेचा महत्त्वाचा भाग स्पष्ट होतो. माझ्या मते या निकालाचे चांगले निश्चित परिणाम दिसतील. कुठल्याही राजकीय पक्षाने कोण जिंकले, कोण हरले हा प्रश्न महत्त्वाचा नाही. याचे भांडवल न करता भारतीय लोकशाही कशा रितीने बलवान होईल याकडे कटाक्ष दिला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.