मुंबई : पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवड येथे झालेल्या पोटनिवडणूक भाजप आणि काँग्रेसने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवून हा सामना बरोबरीत राखला. कसबा पेठ येथील निवडणुकीत भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव करून कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर यांचा विजय झाला. तर चिंचवड येथे भाजपच्या अश्विनी जगताप यांनी राष्ट्रवादीच्या नाना काटे यांचा पराभव केला. याचे पडसाद विधानसभेत उमटले. काँग्रेसचे नाना पटोले यांनी हा मुद्दा छेडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डिवचले. त्यामुळे फडणवीस यांच्या संतापाचा पारा चढला.
विधानसभेच्या कामकाजाची सुरवातच संजय राऊत यांच्या ‘त्या’ विधानावरून झाली. अध्यक्षानी हक्कभंग समितीचीच सदस्यांची नेमणूक करण्याची घोषणा सभागृहात केली त्याला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हरकत घेतली. एकीकडे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये खडाजंगी होत असतानाच दोन्हीकडील सदस्यांचे लक्ष कसबा आणि चिंचवड येथील निकालाकडे लागले होते.
कसबा येथे काँग्रेस आणि चिंचवड येथे भाजप जिंकत असल्याचा कल येऊ लागला. विधान परिषद निवडणुकीत भाजपला नागपूर आणि अमरावतीची जागा गमवावी लागली. तर, भाजपचा गेल्या ३० वर्षांपासून असलेला कसबा हा बालेकिल्लाही ढासळला. यावरून नाना पटोले यांनी फडणवीस यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला.
कसबा येथे भाजपचा ११ हजार मतांनी पराभव झाला. त्यामुळे भाजपाला आत्मचिंतन करण्याची गरज आहे. तर, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे काँग्रेसचे निवडून आलेले नवे सदस्य रविंद्र धंगेकर यांना सभागृहात जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी करत चांगला टोला लगावला.
नाना पटोले यांच्या या टोल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा संताप वाढला. नाना एखादा निकाल लागला म्हणून तो सभागृहात सांगण्याची गरज आम्हाला लागत नाही. कसबा येथील जो काही कौल आला त्याचे आम्ही थोडे आत्मचिंतन करु.
फक्त कसबाचा निकाल पाहू नका. तीन राज्यांचा निकाल पहा. तिथे काँग्रेस दिसतही नाही. त्यामुळे थोडे आत्मचिंतन तुम्हीही करा, त्याची काळजी तुम्ही करा, असा प्रतिहल्ला फडणवीस यांनी केला.
नाना पटोले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या वादात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हस्तक्षेप करत निवडणुकीचा निकाल अधिकृत जाहीर केल्यानंतर त्याचे प्रमाणपत्र उमेदवारांना दिले जाते. निवडणूक आयोगाने तशी अधिकृत माहिती कळविल्यानंतरच नव्या सदस्यांच्या जागेची व्यवस्था नक्की केली जाईल, असे आश्वस्त केले.