मुंबई : नवी मुंबई खारघर (Kharghar) येथील कार्यक्रमादरम्यान उष्माघातामुळे मृत्यू पावलेल्यांचा नेमका आकडा लपवला जातोय, असा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केलाय. सरकारने सध्या तरी या घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलंय. अंबादास दानवे यांनी यावरून आक्रमक भूमिका घेतली आहे. 12 लोकांच्या जीवाला सांस्कृतिक विभागातील अधिकारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, असं वक्तव्य दानवे यांनी केलंय.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कामोठे येथील एम.जी. एम व खारघर येथील टाटा रुग्णालयात जाऊन उष्माघातामुळे बाधित श्रीसेवकांच्या तब्येतीची विचारपूस केली. सांस्कृतिक विभागाचे मंत्री यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही दानवे यांनी केली.
ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा मी आदर करतो. मात्र त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना राज्य सरकारने येणाऱ्या श्री सदस्यांसाठी केलेली उपाययोजना अत्यंत अपुरी होती. त्यामुळे उष्माघाताने अनेकांचा मृत्यू झालाय. सरकारने सध्या 12 जणांचा आकडा सांगितलाय. हा आकडा लपवला जातोय, अशी चर्चा आहे. कुणी म्हणतंय, 20 पर्यंत हा आकडा आहे. मी सरकारला आवाहन करेल, खरी बाब समोर येऊ द्या. 12 लोकांच्या जाण्याला सांस्कृतिक विभागातील संबंधिक अधिकारी, सचिव दोषी आहेत, असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलंय. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.
दरम्यान, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार देणं म्हणजे महाराष्ट्र द्रोह्याच्या हस्ते पुरस्कार देण्यासारखं आहे. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या हस्ते हा पुरस्कार का दिला नाही, असा सवाल अंबादास दानवे यांनी केलाय. या घटनेची जबाबदारी घेत संबंधित मंत्र्याने राजीनामा द्यावा, अशी मागणी दानवे यांनी केली आहे.
पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते रविवारी नवी मुंबई येथे महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्यात आला. खारघर येथे सेंट्रल पार्कवरील मैदानावर हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोहळ्यात उपस्थित 50 हून जास्त जणांना उष्माघाताचा त्रास झाला. यात 12 जणांचा मृत्यू झालाय. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसदेखील आक्रमक झाली आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी यावरून राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याचं म्हटलंय. तर काँग्रेसने मात्र मवाळ धोरण स्वीकारल्याचं दिसतंय. मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आम्ही करणार नाही, असं वडेट्टीवारांनी स्पष्ट केलंय. मात्र सरकारच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली, याची पुनरावृत्ती होऊ नये, असं वडेट्टीवार यांनी म्हटलंय.