पुणे : सबसे कातील गौतमी पाटील म्हणून तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या गौतमी पाटीलची (Gautami Patil) क्रेझ दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गौतमी पाटील म्हटलं की कार्यक्रम हाऊसफुल्ल जाणारच हे समीकरण जणू ठरलं आहे. एवढंच कशाला गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात धांगडधिंगा होणारच हे ही ठरलेलंच आहे. गौतमीच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी असते की बसायला जागा नसल्याने तरुण मुलं झाडावर बसून कार्यक्रम एन्जॉय करतात. पोलिसांच्या लाठ्या खातात पण गौतमीचा कार्यक्रम पाहतातच, एवढी गौतमीची ग्रामीण भागात क्रेझ आहे.
गौतमी पाटीलचे सार्वजनिक कार्यक्रम होत असतात. गावच्या जत्रेनिमित्ताने, गावातील उत्सावाच्या निमित्ताने, सार्वजनिक मंडळाकडून तर कुणाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गौतमीचे कार्यक्रम होत असतात. मध्यंतरी तर एका हौशी व्यक्तीने तर आपल्या बैलाच्या वाढदिवसानिमित्ताने गौतमीचा कार्यक्रम ठेवून धमाल उडवून दिली होती. हे कमी की काय आता गौतमीच्या कार्यक्रमाचा आणखी एक किस्सा समोर आला आहे. मुळशीमध्ये गौतमीचा कार्यक्रम चक्क एका बैलासमोर झाला. भला मोठा स्टेज बांधलेला. गौतमी आणि तिचे साथी कलाकार देहभान विसरून नृत्य करत आहेत. समोर प्रचंड मोठं मैदान अन् मैदानात प्रेक्षकच नाही. फक्त एक बैल बांधलेला. या बैलासमोरच गौतमीचा कार्यक्रम झाला. गौतमीनेही आपली अदाकारी करत हा कार्यक्रम पार पाडला. त्यामुळे या कार्यक्रमाची एकच चर्चा रंगली आहे.
बावऱ्या समोर अदाकारी
मुळशीत विवाहच्या हळदी कार्यक्रमानिमित्त गौतमी पाटीलच्या डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. स्टेजसमोरच बावऱ्या बैल बांधण्यात आला होता. मुळशीतील सुशील हगवणे यांच्या युवा मंचच्या बावऱ्या फॅन्स कल्बने हा कार्यक्रम आयोजित केला होता. समोर बैल बांधलेला होता तरीही गौतमी पाटील हिने नेहमीप्रमाणेच नृत्य सादर केले. या कार्यक्रमाचे शुटिंगही करण्यात आले असून सध्या या कार्यक्रमाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
कारण काय ?
बावऱ्या बैलासमोर गौतमीने कार्यक्रम केल्याने त्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. बैलासमोर गौतमीने नृत्य का केले? आयोजकांनी असं का केलं? असे सवालही या निमित्ताने केले जात असून त्याचं उत्तरही मिळालं आहे. लग्नानिमित्ताने मांडव टिळ्याचा कार्यक्रम होता. पूर्वी लग्नात दाराबाहेर मांडव घातला जात असे. त्या मांडवातूनच नवरदेवाची वाजतगाजत वरात निघत असे. बैलगाडीतून ही वरात निघायची. हीच पंरपरा कायम ठेवायची होती. पण मिरवणूकही काढायची नव्हती. त्यामुळे गौतमीच्या नृत्याचा कार्यक्रम ठेवला. बैलगाड्याचं प्रतिक म्हणून घरातील बैल कार्यक्रम स्थळी उभे केले, अशी माहिती कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र हगवणे यांनी दिली.