कोल्हापूर | 17 ऑगस्ट 2023 : 2024 ची लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात युती आणि आघाडीतून वेगवेगळ्या मतदारसंघात चाचपणी केली जात आहे. कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा उमेदवार दिल्यास निवडणूक जिंकू शकतो. याबद्दल चर्चा होत आहे. अशातच राज्याचे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी कोल्हापूरच्या लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. कोल्हापूरची लोकसभेची जागा काँग्रेसने लढावी ही माझी इच्छा आहे. कारण याठिकाणी आम्हाला चांगलं वातावरण आहे. खूप वर्षांपासून इथं काँग्रेसला चांगलं वातावरण आहे. काँग्रेसने जाग लढल्यास ती आम्ही जिंकू शकतो, असं अशोक चव्हाण म्हणालेत.
मागच्या मंत्रिमंडळात अजितदादा उपमुख्यमंत्री होते, मी देखील मंत्रिमंडळात होते. मराठा आरक्षणाबाबत आता मुंबईत बैठक घेऊन उपयोग नाही. अजितदादांना देखील कायदा कळतो. केंद्राने आता निर्णय घ्यायला पाहिजे. केंद्र सरकारने त्यावेळी राज्याचे हातपाय बांधून टाकले होते.
एकनाथ शिंदे आणि आमची भूमिका होती की, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. फडणवीस सरकारच्या काळात जो निर्णय झाला. ती केवळ नागरिकांची दिशाभूल होती. आता 50 टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवली पाहिजे. मराठा आणि ओबीसी यांच्यात वाद होऊ शकतो. पण असे वाद होऊ नये, अशी माझी इच्छा आहे, असं अशोक चव्हाण म्हणालेत.
आमची 1 तारखेला इंडिया ची बैठक मुंबईत आहे. देशाला दिशा देण्यासाठी इंडिया आघाडी तयार आहे. प्रत्येक राज्यात वेगवेगळी परिस्थिती आहे. मात्र आम्ही सगळे एकत्र येऊन नवा पर्याय देऊ. नागरिकांना देखील ही इंडिया आघाडी आवडत आहे, असं म्हणत ‘INDIA’ आघाडीच्या मुंबईत होणार्या बैठकीवर प्रतिक्रिया दिली आहे.
केंद्र आणि राज्य सरकारकडून घोषणा झाल्या. पण प्रत्यक्ष अंमलबजावणी कुठंही होत नाही. सगळ्यात जास्त निधीच्या घोषणा या सरकारने केल्या. पण ग्राऊंडवर मात्र नागरिकांना काही मिळताना दिसत नाही. त्यामुळे लोकांमध्ये संताप आहे, असं अशोक चव्हाण म्हणालेत.
सध्याचं सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही. या सरकारला लोकसभा आणि विधानसभा यावर परिणाम होईल अशी भीती सरकारला आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा झाल्याशिवाय या निवडणुका घेतात की नाही याबद्दल शंका आहे, असंही अशोक चव्हाण म्हणालेत.