धनंजय महाडिकांचा लाडक्या बहिणींना दम, मग माफी; कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात नवं वादळ

| Updated on: Nov 10, 2024 | 12:38 PM

Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana : राज्य सरकारच्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'वरून सध्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी घडत आहेत. असं असतानाच आता भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी या लाडकी बहीण योजनेवर भाष्य केलं. वाचा सविस्तर बातमी....

धनंजय महाडिकांचा लाडक्या बहिणींना दम, मग माफी; कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात नवं वादळ
धनंजय महाडिक, नेते, भाजप
Image Credit source: Facebook
Follow us on

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या जाहीर सभांमधून राजकीय नेते संबोधित करत आहेत. असं असतानाच काही विधानांची मात्र राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. कोल्हापूरमधील एका सभेत बोलताना भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरून एक विधान केलं. ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि काँग्रेसच्या प्रचाराला जात आहेत. त्यांचे फोटो काढून घ्या, असं धनंजय महाडिक म्हणालेत. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. त्यानंतर धनंजय महाडिक यांनी या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.

महाडिकांच्या विधानाने नवा वाद

जर इथं काँग्रेसची रॅली निघाली. त्यामध्ये जर तुम्हाला महिला दिसल्या. ज्या आपल्या योजनेचे 1500 रूपये घेतात. त्यांचे फोटो काढून घ्या. फोटो काढा त्यांची नावं लिहून घ्या. बरोबर आहे की नाही…. म्हणजे घ्यायचं आपल्या शासनाचं आणि जायचं त्यांच्या रॅलीत असं नाही चालणार. काही लोक छाती बडवत होते. आम्हाला नको पैसै… आम्हाला नको पैसै आम्हाला सुरक्षा पाहिजे, असं म्हणत होते. पैसे नकोत? राजकारण करता या पैशाचं? काँग्रेसच्या सभेला जर महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढायचे. फोटो आमच्याकडं द्या, आम्ही त्यांची व्यवस्था करतो. जर कुणी मोठ्यानं भाषण करायला लागली. दारात आली तर लगेच फॉर्म द्यायचा. म्हणायचं बाई तुला नको आहेत ना पैसै? मग यावर सही कर म्हणायचं. लगेच उद्यापासून पैसे बंद करतो म्हणायचं. आमच्याकडं काय पैसे लय झालेले नाहीत, असं धनंजय महाडिक म्हणालेत.

महाडिकांचं स्पष्टीकरण

धनंजय महाडिक यांच्या या विधानाची चर्चा सुरु झाल्यानंतर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना आता बोलण्यासारखं काहीच मुद्दे राहिलेलं नाहीत. म्हणून ते गैरसमज पसरवत आहेत, असं धनंजय महाडिक म्हणाले आहेत.

ज्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये सहभागी होतील त्यांचे फोटो काढून पाठवा त्यांचे व्यवस्था आपण करू असं मी म्हणालो. कदाचित अशा महिलांना लाडका बहीण योजनेचे लाभ मिळाले नसतील. त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी हे वक्तव्य केलं होतं, असं म्हणत धनंजय महाडिक यांनी कालच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे.