कोल्हापूर : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर असलेला शिवसैनिकांचा राग गेल्या दोन दिवसांपासून विविध निदर्शनाद्वारे व्यक्त केला जात आहे. कोल्हापूरातही (Kolhapur Shivsena) कालपासून याचे पडसाद उमटू लागले आहेत. माजी आमदार, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) हे एकनाथ शिंदे गटात सामील झाल्याने त्याचे पडसाद कोल्हापुरातही उमटले असून आज शनिवारी सकाळी माजी नगरसेवक रविकिरण इंगवले (Ravikiran Ingwale) यांनी त्यांच्या समर्थकांसह राजेश क्षीरसागर यांच्या शिवसेना फलकावरील त्यांचे फोटो फाडले आ्हेत. कालही त्यांच्या नावाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.
कोल्हापुरातील या घटनेने राजेश क्षीरसागर यांनी गुवाहाटी येथून व्हिडिओद्वारे मी कमजोर नाही. तू गुंड आहेस, मी सुशिक्षित गुंड आहे असा गर्भित इशारा माजी शहराध्यक्ष रविकिरण इंगवले यांना गुवाहाटीमधून त्यांना देण्यात आला असून मी एकनाथ शिंदे यांचा पठ्या आहे, तुला सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्हिडीओद्वारे सांगितले की, शिवसेनेत गेल्या आठवड्यापासून ज्या घडामोडी सुरु आहेत, त्याचा गैरफायदा काही जण घेत आहेत. वरिष्ठांच्या सुचनेनुसार कोल्हापुरातील स्वत:ला गुंड समजणारे, मात्र त्याच्यात काही दम नसलेल इंगवले शिवसेना फलकावरील माझे फोटो फाडत आहेत. त्याला मी इतकाच इशारा देतो की, तू गुंड आहेस पण मी सुशिक्षित गुंड आहे. त्यामुळे बाकीचे सर्व खेळ बंद कर अन्यथा पळता भुई थोडी होईल असा इशाराही त्यांनी रविकिरण इंगवले यांना दिला आहे.
यावेळी राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापुरातील शिवसेनेचा इतिहास सांगत आपण शिवसेनेसाठी काय केले तेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी सांगितले की, शिवसेनेसाठी गेल्या 36 वर्षात माझे जे योगदान आहे ते बाकी कुणाचे नाही. शिवसेना मी घडवली. 2004 साली ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा शिवसेना संपली होती. त्यावेळी मी काय केलं ते मला माहित आहे असे सांगत जर वैयक्तीक द्वेषाचा कोण फायदा घेत असेल तर अशा लोकांना पाठिशी घालू नका असेदेखील त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना आवाहन केले.
रविकिरण इंगवले यांच्या या कृत्याला राजेश क्षीरसागर यांनी हे प्रत्युत्तर दिले असल्याने कोल्हापुरातील राजकारण आणखी तापणार असल्याचे दिसत आहे.