भूषण पाटील, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर | 02 डिसेंबर 2023 : कर्जतमध्ये झालेल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांने मोठे गौप्यस्फोट केले. त्यांच्या या गौप्यस्फोटांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. अजित पवार यांच्या विधानावर राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्र देण्यात आलं. अनिल देशमुख देखील आपल्यासोबत येणार होते. मात्र ऐनवेळी त्यांनी नकार दिल्याचं अजित पवार म्हणालेत. यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी जे सांगितलं. ते वस्तूस्थितीला धरून आहे. अनिल देशमुख आमच्यासोबत येणार होते. पण नंतर त्यांनी नकार दिला. त्यांनी इतकं खोटं बोलू नये. अजित दादांना सुपारी द्यायचा प्रश्न येत नाही. प्रफुल्ल पटेल यांनी यावर सविस्तर सांगितलं आहे, असं हसन मुश्रीफ म्हणालेत.
आगामी लोकसभा निवडणुकीत आपण ताकदीने उतरणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं. या सुप्रिया सुळे खासदार असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातही आपण उमेदवार देणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं. त्यावरही हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आता जिथे आमचे खासदार आहेत. त्या जागा आम्हीच लढवणार आहोत. त्यात बारामतीसुद्धा आहे. बारामतीत गृहकलचा प्रश्न नाही. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आम्हाला प्रामाणिक राहावंच लागेल, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
एक नवीन पक्ष काढा. नवीन निशाणी घ्या आणि स्वत:च कर्तुत्व सिद्ध करुन दाखवा, असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत अजित पवार यांना दिलं. त्यावर मुश्रीफांनी प्रतिक्रिया दिली आहे. ज्या पक्षात इतकी वर्ष काम केलं तो पक्ष सोडून दुसरा पक्ष कसा काढणार? जो पक्ष कष्ट करून वाढवला त्याबद्दल वेगळ्या भावना असतात, असं मुश्रीफ म्हणालेत.
सातारा ते कोल्हापूर नॅशनल हायवेचे काम सुरू आहे. पंचगंगा नदी पात्रात भराव घालुन काम सुरू आहे. भविष्यात महापूर येण्याची शक्यता आहे. हा भराव टाकून काम करू देणार नाही अशी नागरिकांची भूमिका आहे. काल नितीन गडकरी यांची तातडीने भेट घेतली. त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांना कॉल करून पिलर घालून काम करण्याचे आदेश दिले आहेत, असंही हसन मुश्रीफ यांनी सांगितलं आहे.